गणेश धुरीनाशिक, दि. 18 : वारंवार जनजागृतीद्वारे आवाहन करूनही फास्टफूडचे नागरिकांचे प्रेम आणि सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष यांच्या मिलीजुलीमुळे पावसाळ्यातही उघड्यावरील अन्न पदार्थांची विक्री नाशिकला जोरात सुरू आहे.नाशिकला सर्वात गजबजलेला परिसर म्हणजे मेनरोड. मेनरोडला जोडणा-या सर्वच रस्त्यांवर नाशिककरांना उघड्यावरील समोसा, साबुदाणा वडा आणि पाववडा येता जाता आकर्षिक करत असतो. भद्रकाली परिसरातील दूधबाजारात प्रसिद्द मुंगभजी, पिंपळ पारानजिकचा प्रसिद्ध साबुदाणा वडा आणि नेहरू गार्डनजवळील समोसा, हे तर नाशिककरांच्या जिव्हाळ्याचे आणि आवडते पदार्थ. कितीही गर्दी असली तरी नंबर लावून नाशिककर हे पदार्थ खाण्यासाठी गर्दी करतात.
मात्र पावसाळ्यात या उघड्यावरील पदार्थांच्या खाण्यामुळे अनेक साथरोंगाची लागण होत असल्याचे प्रकार दरवर्षी घडत असतात. आणि दरवर्षी ह्यनेहमीची येतो पावसाळाह्ण असे मानत नाशिककर खवय्ये समोशावर आणि साबुदाणा खिचडी व साबुदाणा वडयावर ताव मारत असतात. यंदाही पावसाळा असूनही उघड्यावरील समोसे आणि पाववडे खाण्यात नाशिककरांनी आघाडी घेतली आहे. उघड्यावरील अन्न पदार्थांवर जिभेचे चोचले पुरविण्यासाठी ताव मारतांना अनावधनाने आपण साथरोगांनाही आमंत्रण देत असल्याचे नाशिककरांना काहीही सोयरसुतक नाही. यंत्रणाही मग साऱ्याकडे सोयीने दुर्लक्ष करते.