ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २३ - पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व्हर रुम व सिटी व्हिजिटर इन्फॉर्मेशन आणि रिकार्ड व्यवस्थापन यंत्रणा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचा शुभारंभ अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.जगन्नाथन यांनी सकाळी साडेअकरा वाजता केला. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत ढीवरे, विजय पाटील आदि उपस्थित होते.
या यंत्रणेच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज संगणकीकृत यंत्रणेद्वारे जोडले गेले आहे. यामुळे दैनंदिन गुन्हयांची माहिती, चारित्र्य पडताळणी अर्ज, पासपोर्ट प्राप्ती अर्जाबाबत तत्काळ कार्यवाही करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना जलदगतीने कार्यालयीन कामे होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठीही ही संगणकीकृत आधुनिक यंत्रणा उपयोगी पडणार आहे. आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात असलेल्या विविध हॉटेल्स, लॉजमध्ये थांबणारे पर्यटक, तसेच भाडेकरुंची माहिती देखील आयुक्तालयाला या सॉफ्टवेअरद्वारे मिळणार आहे. संबंधित हॉटेल्स, लॉजमध्ये थांबलेल्या लोकांची यादी त्या भागातील पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांना तत्काळ या सॉफ्टवेअरचा वापर करत बघता येणार आहे. तसेच ती माहिती आयुक्तालयालाही पुरविता येणार आहे.