नाशिक – मिसळ म्हटलं तर अगदी लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ, महाराष्ट्रात मिसळप्रेमींची संख्या प्रचंड आहे. पुणेरी मिसळ, मुंबई मिसळ, कोल्हापुरी मिसळ त्याचसोबत नाशिक मिसळही फेमस आहे. खवय्यांच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या मिसळ पावाची भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या प्रसिद्ध सीताबाईची मिसळ सीताबाई मोरे यांचे निधन झालं.
‘मिसळवाल्या आजी’ म्हणून नाशिकमध्ये सीताबाई मोरे प्रसिद्ध होत्या. मंगळवारी नाशिकमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीताबाईच्या जाण्यानं खवय्यांनी हळहळ व्यक्त केली. जवळपास ७५ वर्ष नाशिककरांवर सीताबाईंनी त्यांच्या हातच्या मिसळनं भूरळ पाडली होती. वयाच्या ९४ व्या वर्षी सीताबाई मोरे यांची प्राणज्योत मालवली. सीताबाई मोरे यांच्या मिसळनं नाशिकच्या खाद्य संस्कृती आणखी भर पडली होती. सीताबाईंच्या योगदानामुळेच नाशिकची मिसळ प्रसिद्ध झाली.
जुन्या नाशिकच्या एका भागातून सीताबाई मोरे यांनी मिसळ व्यवसायास सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू ‘मिसळवाल्या आजी’ म्हणून त्यांनी नावलौकीक कमावलं. अगदी कमी काळात सीताबाई मोरे यांनी नाशिकमध्ये प्रसिद्धी मिळवली होती. यशस्वी उद्योजिका म्हणूनही त्यांचं नाव झालं होतं. संपूर्ण शहरात मिसळ विक्रीमध्ये आजीबाई फेमस होत्या. नाशिकमध्ये अनेक मिसळ विक्रेते निर्माण झाले परंतु ‘मिसळवाल्या आजी’नं बनवलेल्या मिसळची चव कुणालाच जमली नाही.
पतीच्या आजारपणामुळे सीताबाई मोरेंनी उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय निवडला होता. मिसळ दुकानाच्या जोरावरच आजीनं त्यांच्या मुलांचे संगोपन केले. नातवंडं आल्यानंतरही स्वत: सीताबाई मोरे हॉटेलमध्ये जातीनं हजर असायच्या. जुन्या शहराच्या छोट्या भागातून सुरु झालेल्या या व्यवसायानं नाशिकमध्ये ३ वेगवेगळ्या शाखा निर्माण केल्या. ‘मिसळवाल्या आजी’ नावानं प्रसिद्ध असणाऱ्या याच सीताबाई मोरे अखेर आज अनंतात विलिन झाल्या परंतु आजी कायम नाशिकच्या खवय्यांच्या मनात कायम अधिराज्य गाजवतील.