लोकमत ऑनलाइन
नाशिक, दि. २९ - सिंहस्थ कुंभमेळ्यात दहाही आखाड्यांचे पहिले पर्वणी शाहीस्नान संपन्न झाले असून थोड्याच वेळात भाविकांना स्नान करता येणार आहे. कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली, गोदावरी नदीवरील त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांनी या शाहीस्नानाला सुरुवात केली. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी जुना, अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीस्नान केले. त्यानंतर निरंजन, आनंद, अटल, महानिर्वाण व निर्मोही या आखाड्यातील साधूंनी शाहीस्नान केले. स्नानानंतर सर्व आखाड्याच्या साधूंनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीमार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-महंतांचे स्वागत केले. कुशावर्त तीर्थावर प्रस्थान करताना नागा साधूंच्या मिरवणूका काढण्यात आल्या.
नाशिकक्षेत्री गोदावरी नदीवरील रामकुंड आणि त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांचे शाहीस्नान होईल, त्यानंतर भाविकांना रामकुंड व कुशावर्त खुले केले जाईल. सर्वसाधारणपणे नाशिकला सकाळी ९, तर त्र्यंबकेश्वरला सकाळी १०.३० वाजेपर्यंत शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होईल. त्यानंतर धर्मोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असलेल्या दोन्ही शाही मिरवणुकांचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येईल.
त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर साधू-महंतांचे पहिले जवळपास शाहीस्नान आटोपले आहे. शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडले असून नाशिकमधील रामकुंडावर आठच्या सुमारास असाच कार्यक्रम पार पडेल. तसेच, साधू-महंतांचे शाहीस्नान झाल्यानंतर इतर भाविक शाहीस्नान करतील असे पालकमंत्री व कुंभमेऴा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
या सिंहस्थ कुंभमेऴयासाठी देशभरातून लाखो भाविक आणि साधू-महंत दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या कुंभमेळ्यादरम्यान चारवेळा शाहीस्नानाचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये २९ ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी गोदावरीच्या रामघाट आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडात होणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी वैष्णव संन्याशांचे शाहीस्नान रामघाटावर, तर २५ सप्टेंबर रोजी शैव संन्याशाचे शाहीस्नान कुशावर्त कुंडात होणार आहे.