औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात यंदाच्या हंगामात उर्ध्व भागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठवाड्याची १९.५ टीएमसीची मागणी मात्र मान्य करण्यात आली नाही. धरणांमधून पाणी सोडण्यास अजून आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याची चिन्हे आहेत.पाण्याचा वहनव्यय (वॉटर लॉस) लक्षात घेता प्रत्यक्षात जायकवाडी धरणात ८ टीएमसी एवढेच पाणी मिळेल, असे सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थितीशी मुकाबला करत असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी होत आहे. महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. उर्ध्व भागातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विकास महामंडळाचे नाशिक येथील मुख्य अभियंता निर्णय घेतील, असे बिराजदार म्हणाले. जायकवाडीच्या उर्ध्व धरणांमध्ये एकूण ६४.९१ टीएमसी पाणी पावसाळ्यात उपलब्ध झाले आहे. त्यापैकी खरीप हंगामासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांनी १५.६ टीएमसी पाणी वापर केला आहे. गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्यासाठी शनिवारी जलचिंतन संस्था व पाणीवाटप संस्थेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. नाशिक प्रशासन अनुत्सुकनाशिक जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत अनुत्सुकता दर्शविली आहे. बैठकीत प्रतिनिधित्व करणारे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सध्याची टंचाई परिस्थिती पाहता नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)पाणी पिण्यासाठीच- विजय शिवतारेशिर्डी : अहमदनगर-नाशिकच्या धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पिण्यासाठी व शेतीसाठी आहे़ मद्य निर्मितीसह तेथील अन्य उद्योगांना त्यातील एक थेंबही देण्यात येणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिर्डीत दिली़ साई दर्शनासाठी आलेल्या शिवतारे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारेच व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा निर्णय झाला आहे. सरकारचा यात कोणताही हस्तक्षेप नाही.
नाशिक, नगरमधून जायकवाडीला पाणी
By admin | Published: October 18, 2015 1:19 AM