मुंबई : नाशिक शस्त्रसाठा प्रकरणामागचा मास्टरमाइंड बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका उर्फ पाशा (२७) याच्या कॉल सीडीआरद्वारे पोलीस अधिक चौकशी करत आहेत. त्याच्या सीडीआरमधून मुंबईतल्या १२ ते १३ जणांच्या तो सतत संपर्कात असल्याचे समोर आले. त्यानुसार, यामधील संशयितांचा शोध नाशिक पोलीस घेत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ६ तर नाशिक पोलिसांनी ५ अशाप्रकारे एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.नाशिक पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह शिवडीतील पाशा तसेच सलमान अमानुल्ला खान (१९) आणि वडाळ्याचा नागेश राजेंद्र बनसोडे (२३) यांना अटक केल्यानंतर तिघांची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. त्यापाठोपाठ बोलेरो गाडीत चोरकप्पे तयार करण्यासाठी मदत करणारे अमीर आणि वाजीदच्याही त्यांनी मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेनेही आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.अशात पाशाच्या अन्य साथीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नाशिक पोलिसांनी त्याच्या मोबाइल सीडीआरचा आधार घेतला. त्याच्या मोबाइल सीडीआरमधून मुंबईतील १२ ते १३ जणांच्या तो सतत संपर्कात असल्याची माहिती समजते. यापैकी काही जणांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय नाशिक पोलिसांना आहे. त्या दिशेने त्यांचा शोध सुरू आहे.दुसरीकडे मुंबई गुन्हे शाखेकडून बोलेरो चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या चौकशीतून ज्यांची नावे समोर येत आहेत, त्यांच्याकडे पोलीस अधिक तपास करत आहेत. यात मुंबईतल्या काही संशयितांच्या नातेवाइकांची नावे पुढे आली असून त्यांचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
नाशिक शस्त्रसाठा प्रकरण : पाशाच्या सीडीआरद्वारे संशयितांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 3:37 AM