इस्लामपूर : महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा हँडबॉल संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या ४३व्या पुरुषांच्या राज्य अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धेत नाशिकने सोलापूर संघाचा २१-१७ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यातील वेगवान व आक्रमक खेळाला इस्लामपूरच्या क्रीडा रसिकांनी मोठ्या जल्लोषात दाद दिली.येथील नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहातील मैदानावर न्यू सम्राट क्रीडा मंडळातर्फे या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरचा संघ उपविजेता ठरला, तर यजमान सांगलीने भंडाऱ्याचा ३९-३५ असा पराभव करीत तृतीय स्थान पटकावले.नाशिक विरुध्द सोलापूर या संघांमधील अंतिम सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. त्यामध्ये अवघ्या ४ गोलच्या फरकाने नाशिकने हा सामना २१-१७ अशा गोलफरकाने जिंकला. नाशिकच्या शंकर व अक्षय काळे यांनी आक्रमक खेळ केला, तर सोलापूरच्या अतुल गवळी आणि अजय परदेशी यांनी कडवी झुंज दिली. सांगलीनेही अवघ्या ४ गोलच्या फरकाने भंडारा संघावर मात केली. सांगलीच्या सूरज मगदूम, भारत पाटील, सुहास साळुंखे यांनी वेगवान खेळ केला. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने यांच्याहस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी राज्य हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव अशोकसिंग रजपूत, जिल्हा सचिव प्रा. जहाँगीर तांबोळी, छत्रपती पुरस्कार विजेते कुस्तीगीर नजरुद्दीन नायकवडी, कबड्डी प्रशिक्षक विरसेन पाटील उपस्थित होते. भारतीय खेल प्राधिकरणचे सहाय्यक संचालक वीरेंद्र भांडारकर अध्यक्षस्थानी होते.यावेळी मदने म्हणाले, इस्लामपूर शहरात कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, हॉकी या खेळांसह हँडबॉलचे गुणवान खेळाडू घडत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. विनोद कांबळे यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यात दिलेले योगदान अमूल्य आहे. या स्पर्धेत राज्यातील ३० जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता. न्यू सम्राटचे अध्यक्ष विकास गावडे, उपाध्यक्ष विलास पाटील, सचिव विनोद कांबळे, महेश करे, दत्ता पाटील, जयदीप निकम, बबन करे यांनी स्पर्धेचे नेटके संयोजन केले. (वार्ताहर)
नाशिकला अजिंक्यपद
By admin | Published: March 16, 2015 10:50 PM