नाशिक : भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासात तोफखाना (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी) विभागातील महावीर जवानांनी मोलाची भर घातलेली असून देशाच्या सीमा, प्रतिष्ठा व दबदबा कायम ठेवल्या आहेत़ देशाच्या वेगवेगळे राज्यातून आलेले विविध धर्माचे व बोलीभाषा असलेले तरुण जेव्हा सैन्यात भरती होतात तेव्हा त्यांच्यासाठी भारत देश हाच एकमेव धर्म असतो़ भारतीय सैन्यदल हे विविधतेत एकता असलेले एकमेव जिवंत उदाहरण असून देशासाठी सर्वोच्च बलीदान देण्याची वेळ आली तरी सैनिकाच्या मनात यत्किंचितही शंका येत नसल्याचे प्रतिपादन मेजर जनरल पी़पी़प्रकाशसिंह यांनी केले़
देशातील सर्वात मोठ्या नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर गुरुवारी (दि.२३) झालेल्या शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून मेजर प्रकाशसिंह बोलत होते़ सैनिकी जीवनात शिक्षण ही निरंतन प्रक्रिया असून नवीन गोष्टी आत्मसात करून आपले सामर्थ्य वाढविण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा़ आगामी काळात तोफखाना विभागाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण असून आपल्या प्रशिक्षणात सातत्य ठेवून प्राप्त झालेल्या सैनिकी कौशल्याचा देशसेवेसाठी परिपुर्ण वापर करा, देशासाठी सर्वोच्च बलीदान देण्याचे भाग्य प्रत्येकाला मिळत नसल्याचे मार्गदर्शनात प्रकाशसिंह यांनी सांगितले़
तोफखाना केंद्रातील सैन्यदलात भरती झालेल्या ४१७ प्रशिक्षणार्थी जवानांनी सैन्याच्या प्राथमिक व प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने ४२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. जवानांची ही तुकडी देशसेवेसाठी सज्ज असून, विविध ‘युनिट’मध्ये सैन्यदलाच्या तोफखान्यात हे नवसैनिक भविष्यात योगदान देणार आहेत. लष्करी बॅण्डच्या ‘शेर-ए-जवान’ या वैशिष्ट्यपूर्ण धूनच्या तालीवर नवसैनिकांच्या चार तुकड्यांचे लष्करी थाटात कवायत मैदानावर आगमन झाले. दरम्यान, प्रकाशसिंह हे सलामी मंचावर येताच ग्रुप कमांडर बी़मंजूनाथसह जवानांच्या तुकडीने त्यांना ‘सॅल्यूट’ केले.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या तुकडीने लष्करी बॅण्डच्या तालावर सशस्त्र संचलन केले तर चेतक हेलिकॉप्टरनेही यावेळी सलामी दिली़ यावेळी जवानांनी १९६३ मध्ये भारतीय सैन्यात सामील करण्यात आलेल्या रशियन बनावटीच्या १३० एमएम तोफेचे प्रात्यक्षिक करून दाखविले़ या तोफेने १९६५, १९७१ व १९९९ च्या युद्धात विशेष योगदान दिले आहे़ समीक्षक अधिकारी प्रकाशसिंह यांनी जवानांना ‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना बलिदान देना पडे...’ अशी शपथ दिली़
(सर्व छायाचित्रे : राजू ठाकरे)