नाशिक : पंजाब नॅशनल बँकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पुण्यातील पाच संशयितांनी नाशिकमधील एकाची पंधरा लाख रुपयांची फसणूक केल्याची प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिकरोड पोलीस ठाण्यात गणेश मधुकर पवार (३१, फ्लॅट नंबर २, शिल्पधाम सोसायटी, सिद्धार्थनगर, पंचक, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २५ आॅगस्ट २०१६ ते ७ मार्च २०१८ या कालावधीत संशयित संतोष चंदू गालफाडे (३२, ओम निवास कॉलनी, कोमल निवास, बिजलीनगर, चिंचवड, पुणे), शैलेश रमेश औटी (२४, जुन्नररोड, खेबडे, तांबे आळी, नारायणगाव) हे त्यांच्या घरी आले व पंजाब नॅशनल बँकेत नोकरी लावून देतो, असे सांगत पंधरा लाख रुपयांची मागणी केली़ त्यानुसार पवार यांनी प्रथम दहा लाख रुपये रोख व विद्याधन इन्फ्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने तीन लाख रुपयांचा धनादेश दिला़ यानंतर विद्याधन कंपनीचे भागीदार व संशयित गिरीश ऊर्फ अमित रमेश औटी (जुन्नर रोड, खेबडे, तांबे आळी, नारायणगाव), संजय मधुकर माळवदे (हरी प्लाझा, महात्मा सिक्युरिटी, कोथरुड, पुणे) व अमृता शैलेश औटी (जुन्नररोड, खेबडे, तांबे आळी, नारायणगाव)या तिघांनी नोकरीसाठी पवार यांच्याकडून आणखी दोन लाख रुपये कंपनीच्या नावे आरटीजीएसमार्फत घेतले़ अशा प्रकार संशयितांनी पवार यांच्याकडून पंधरा लाख रुपये घेतले मात्र नोकरी दिली नाही़
यामुळे संशयितांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच फिर्यादी गणेश पवार यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून संशयितांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़