नाशिक : कुरापत काढून युवकावर प्राणघातक हल्ला करणा-या चौघा आरोपींना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़७) सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली़ नाशिक-पुणे रोडवर सचिनदेव गायकवाड या युवकास आरोपी हरेंद्र ऊर्फ बाळा जगन्नाथ पगारे, जयेश लक्ष्मण सोनवणे, अनिकेत ऊर्फ पप्पू राजेंद्र गांगुर्डे, गौरव विकास केदारे यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती़
नाशिक-पुणे रोडवर ५ सप्टेंबर २०१५ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सचिनदेव गायकवाड हा त्याच्या वडिलांसमवेत गप्पा मारत होता़ त्यावेळी आरोपी पगारे, सोनवणे, गांगुर्डे व केदारे हे तिथे आले व आमच्याकडे रागाने का पहातो अशी खुन्नस काढून सचिनदेवला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सचिनदेव यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक एऩ जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून या चौघाही आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकारी वकील व्ही़ डी़ जाधव व शिरीष कडवे यांनी न्यायालयात आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले़ तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. न्यायाधीश शिंदे यांनी या चौघांनाही सात वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली़
आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पैरवी अधिकारी हवालदार के. के. गायकवाड, एस. बी. गोडसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला़ पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे़