नाशिक : शहरात प्रवेश करणा-या वेगवेगळ्या रस्त्यांद्वारे आगमन, घरफोडीचे परफेक्ट प्लॅनिंग, अवघ्या दहा-पंधरा मिनिटात किमती ऐवज साफ केल्यानंतर टोलनाके वाचवत विविध दिशांना फरार होण्याबरोबरच घरफोडीपुर्वी व त्यानंतर मोबाईलचा वापर न करण्याबरोबरच कोणताही इलेक्ट्रॉनिक पुरावा हाती लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेणा-या दिल्लीतील सराईत व केवळ दिवसा घरफोड्या करणा-या चौघा सराईतांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने गुजरातमधील वडोदरा येथून अटक केली़ या टोळीने शहरातील अकरा गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल यांनी सोमवारी (दि़१२) पत्रकार परिषदेत दिली़
शकील उर्फ मुल्ला इस्माईल कुरेशी (६२, रा़मुरादनगर, उत्तरप्रदेश), इर्शाद सिंधु कुरेशी (४६, राग़ाझियाबाद, उत्तरप्रदेश), इशरत अली इज्जत अली (२९, रा़दिल्ली़, मोहम्मद शमशाद मोहम्मद निजाम (१८, रा़ मुरादनगर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेलया सराईत घरफोड्यांची नावे आहेत़ शहरात २०१७ ते १८ या कालावधीत अनेक ठिकाणी दिवसा घरफोड्या होऊनही त्यांची उकल होत नव्हती़ पोलीस आयुक्त सिंगल व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाघ यांनी बाहेरची टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तविली होती़ त्यानुसार आयुक्तांनी निरीक्षक वाघ व सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची स्थापना केली़ सुमारे तीन महिने परिश्रम घेतल्यानंतर संशयित हे दिल्ली, गाझियाबाद, मेरठ येथील असल्याची माहिती पथकास मिळाली़
दिल्लीतील ही टोळी घरफोडीसाठी महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार रविंद्र बागूल, दीपक जठार, पोलीस शिपाई विशाल देवरे, विशाल काठे, स्वप्निल जुंद्रे, गणेश वडजे यांचे पथक गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, बडोदा येथे गेले होते़ बडोदा येथून या चौघांना अटक केल्यानंतर त्यांनी शहरातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत तीन, उपनगर (३), मुंबई नाका (२), गंगापूर, भद्रकाली व आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक अशा अकरा घरफोड्यांची कबुली दिली़ त्यांच्याकडून दहा लाख रुपये रोख, ४५० ग्रॅम वजनाचे सोने, स्विफ्ट डिझायर कार, मोबाईल फोन असा २५ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़
शकील कुरेशी टोळीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणीही घरफोड्या केल्याचे समोर आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या शकिल हा टोळीतील प्रत्येकाला घरफोडीचे प्रशिक्षण देत होता़ यामध्ये माहिर झाले की प्रत्येक जण आपापली वेगवेगळी टोळी तयार करीत असल्याचे सिंगल यांनी सांगितले़ यावेळी पोलीस उपायुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते उपस्थित होते़गत दीड वर्षातील सर्वोत्तम कामगिरीशहरात भरदिवसा घरफोडी करणारी बाहेरची टोळी असल्याची केवळ माहिती मिळाली होती़ त्यानुसार शहर गुन्हे शाखेने गत तीन महिने इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांचा बारकाईने अभ्यासाद्वारे अथक परिश्रम करून दिल्लीतील आंतरराज्यीय टोळीतील म्होरक्या शकिलसह त्याच्या साथीदारांना तीन अटक केली़ पाचवा संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे़ गत दीड वर्षांतील ही सर्वोत्तम कामगिरी असून कोणताही पुरावा नसताना या सराईत गुन्हेगारांना अटक केली़ या तपासाबाबत गुन्हे शाखेला २५ हजार रुपयांचे रिवॉर्ड दिले जाणार आहे़- डॉ़रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिकस्विफ्ट कारला ओएलएक्सवरील कारचा नंबरशहरात येणा-या विविध रस्त्यांनी शकिल व त्याचे साथीदार येत असत़ विशेष म्हणजे घरफोडीपुर्वी वा त्यानंतर मोबाईलचा वापर करीत नसत तसेच काम फत्ते झाल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या दिशांना निघून जात़ शहरात प्रवेश करण्यासाठी वापरत असलेल्या स्विफ्ट कारचा नंबर हा शहरात प्रवेश करण्यापुर्वी त्याची नंबरप्लेट बदललेली असे़ ओएलएक्स या साईटवर विक्रीसाठी असलेली हुबेहूब रंग व मॉडेलच्या कारचा नंबर ते कारवर लावून तिची परिपूर्ण माहिती सोबत ठेवत असत़ कोणताही पुरावा शिल्लक न ठेवल्याने आतापर्यंत ते कधीही पकडले गेले नव्हते़- आनंदा वाघ, पोलीस निरीक्षक, शहर गुन्हे शाखा,नाशिक़