नाशिक : हिरावाडीतील (शिवकृपानगर) येथिल नंदीनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणी पुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवार (दि.२६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्याजवळ ठेवलेल्या तीन गॅस सिलिंडरने पेटले व त्यांच्या स्फोटाने संपूर्ण शिवकृपानगर परिसर हादरून गेला़ या घटनेचे वृत्त कळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात जिवितहानी टळली.
हिरावाडीतील शिवकृपानगर येथे राहणाºया केशव मकलू चौहाण यांचा पाणी पुरी बनविण्याचा व्यवसाय असून त्यांनी आपल्या बंगल्याच्या छतावरच काही वषार्पासून अनधिकृतपणे कारखाना थाटला असून तिथे पाणी पुरी बनविण्याचे काम केले जाते. मंगळवारी पहाटे पाणी पुरी बनविण्याचे काम सुरू असतांना सिलींडरच्या नळीने पेट घेतला व आगीच्या ज्वाळा भडकल्या़ त्यात छतावरील खाद्यतेलाचे डब्यांनी पेट घेतला व आगीने रौद्ररूप धारण केले. या छतावर पाच ते सहा भरलेले गॅस सिलींडर असल्याने ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले व एकापाठोपाठ एक असे तीन भयानक स्फोट झाले़
या सिलिंडरच्या स्फोटानंतर भयभीत झालेल्या नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेतली तर काहींनी लागलीच अग्निशमन दल व पोलिसांना माहिती दिली़ या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोन मजली इमारतीच्या या छतावरील कारखान्यातून आगीच्या ज्वाळा व प्रचंड धूर निघत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्याच्या सहाय्याने सुमारे अर्धा तासात आग आटोक्यात आणली.
दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसून या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़