विधी शाखेत करीअरच्या विविध संधी : ओक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:54 PM2018-02-11T21:54:51+5:302018-02-11T22:07:24+5:30
नाशिक : नामांकित वकील होण्याबरोबरच सर्व भौतिक सोयीसुविधा आपल्याकडे असाव्यात असे विधी शाखेचे शिक्षण घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्यास वाटते़ मात्र, केवळ वकीली हा विधी शाखेच्या शिक्षणातील एकमेव पर्याय नाही, तर न्यायाधीश, सरकारी वकील, विविध खासगी कंपन्या तसेच प्रशासकीय सेवेत विधी अधिकारी, अध्यापक तसेच संशोधन असे विविध पर्याय असून त्याकडे बघण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी रविवारी (दि़११) केले़

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ऩब़ठाकूर विधी महाविद्यालयात आयोजित बाराव्या अॅड़़डी़टी़जायभावे स्मृती राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील अभिरूप न्यायालय (मूट ट्रायल) व निकाल लेखन (जजमेंट रायटिंग) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़
न्यायमूर्ती ओक पुढे म्हणाले की, विधी शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर केवळ वकीली करण्याचा विचार न करता इतरही क्षेत्रांचा विचार करणे ही काळाची गरज बनली आहे़ विधी विद्यापीठांना पूर्णवेळ अध्यापक मिळत नाहीत़ अर्थात यासाठीच्या अटी कारणीभूत असून यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे़ प्रशासकीय सेवेत विधी अधिकारी तसेच न्यायाधीश तसेच संशोधनासाठी या क्षेत्रात चांगला वाव आहे़ न्यायव्यवस्थेचा पारंपारीक चेहरा-मोहरा बदल्याचे आवाहन विधी क्षेत्राचा अभ्यास करणा-या युवकांसमोर असल्याचे ओक म्हणाले़
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीची सचिव डॉ़मो़सग़ोसावी होते़ यावेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयातील अतिरिक्त महाधिवक्ता अॅड. अनील सिंग, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती बी. एच. डांगरे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे, बार कौन्सिल आॅफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजेंद्र रघुवंशी, बार कौन्सिल आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष सतीश देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, अॅड़ अजय मिसर, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़नितीन ठाकरे, समन्वयक अॅड.एस. आर. नगरकर आदी उपस्थित होते.