नाशिक : शासनाने निर्मिती तथा विक्रीसाठी बंदी घातलेल्या तसेच पक्षी व प्राण्यांच्या जिवीतास धोका पोहोचविणाºया नायलॉन माजांच्या विक्रीची व्हॉटसअपवरून जाहीरात करणारे संशयित आदित्य विलास भरीतकर (मखमलाबादरोड, पंचवटी, मुळ रा. रामेश्वरपूर, अकोले, जि. नगर) व रोहित सुधीर चिने (रा. विद्यानगर, मखमलाबादरोड, पंचवटी) या दोघांना भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़२५) रात्री ताब्यात घेतले़
जानेवारी महिन्यातील मकर संक्रातीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ संक्रातीनिमित्त बालगोपाळ मोठ्या संख्येने पतंग उडवितात़ यावेळी आपली पतंग कटू नये यासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो़ मात्र, पशूपक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत असलेल्या या नायलॉन मांजाची निर्मिती व विक्रीस महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे़ मात्र, असे असले तरी तरी नायलॉन मांजाची चोरीछुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते़
सोशल मीडीयावरील व्हॉटसअपवर ‘नायलॉन मांजांचे गट्टू मिळतील’असे संदेश व त्याखाली (मो. क्र. ८४८४८३७०९१, ८६६८५६७९३५, ८४४६००४००४ ) संपर्क क्रमांक दिल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंग सुर्यवंशी यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक कमलाकर जाधव , पोलीस हवालदार सातपूते, पगारे, निंबाळकर यांनी सदर क्रमांकावर संपर्क साधून नायलॉन मांजाची मागणी केली. सबंधीतांनी मांजा घेण्यासाठी सोमवारी (दि.२५)सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवाजी गार्डनच्या गेटजवळ बोलविण्यात आले ़
या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचलेला होता़ मांजा विक्रीसाठी आलेल्या या दोघा संशयितांना पोलिसांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़