नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पिन नंबर घेतल्यानंतर कार्डची अदला-बदल करून पैसे काढणा-या जेलरोड येथील संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ वरिंदर बिलबहादूर कौशल (३३, रा़ फ्लॅट नंबर २ ए, गजानन अपार्टमेंट, संत नरहरीनगर, जेलरोड, नाशिकरोड) असे या भामट्याचे नाव आहे़
पेठरोड येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीममधून श्रीराम भार्गव (६४) हे २० डिसेंबर २०१७ रोजी पैसे काढण्यासाठी गेले होते़ या ठिकाणी असलेला संशयित कौशल याने पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्या एटीएमचा पिन घेऊन कार्डची अदला-बदल केली़ यानंतर नाशिक, ठाणे, मुंबई, जयपूर अशा विविध ठिकाणाहून भार्गव यांच्या खात्यातून ४ लाख २५ हजार रुपये परस्पर काढून घेतले़ या प्रकरणी भार्गव यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी या संशयिताचा शोध घेण्याचे आदेश दिले होते़ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व पथकाने या गुन्ह्यातील संशयिताची सतत माहिती काढून संशयिताचा शोध घेतला असता तो संशयित वरींदर कौशल असल्याचे समोर आले़ नाशिकरोड परिसरात राहणा-या कौशल हा सोमवारी सोमवारी (ता.29) घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचला असता संशयित कौशल स्कोडा वाहनातून आला असता त्यास ताब्यात घेतले़ त्याची पोलीस पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली़
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, नागेश मोहिते, जाकीर पठाण, रवींद्र बागुल, दिलीप मोंढे, विशाल काठे, विशाल देवरे यांनी ही कामगिरी केली़ संशतिय कौशल यास अधिक तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़