नाशिक : पंचवटीतील नाग चौक व आडगाव नाक्यावरील पल्लवी हॉटेलच्या मागे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़६) दुपारी छापा पॉपिस्ट्रॉ नावाचा अमली पदार्थ जप्त केला़ या प्रकरणी संशयित रतन सुभाष मोराडे (रा़ नाग चौक, पंचवटी) व सुरेंद्रपाल सिंग (हिरावाडी रोड) या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३ लाख ४७ हजार ३०० रुपये किमतीचा १०२ किलो पॉपिस्ट्रॉ अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे़
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना आडगाव नाक्यावरील पल्लवी हॉटेलच्या मागे पॉपीस्ट्रॉ या अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार दुपारी चार वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून संशयित सुरेंद्र पालसिंग यास ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर नाग चौकातील रतन सुभाष मोराडे हादेखील पॉपीस्ट्रॉची विक्री करीत असल्याचे सांगितले़ त्यानुसार या दोघांच्याही घरी पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थ ७० किलो पॉपीस्ट्रॉ व पॉपिस्ट्रॉपूर्वीचा ३२ किलो कच्चा माल असा १०२ किलो अमली पदार्थ जप्त केला़
गुन्हे शाखेने या दोघा संशयितांकडून जप्त केलेला पॉपीस्ट्रॉ सील केला असून, त्याचे नमुनेही न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यासाठी सीलबंद केले आहे़ अमली पदार्थांच्या बाजारात पॉपीस्ट्रॉ हा चार हजार रुपये किलोने विक्री केला जातो तर कच्चा माल दोन हजार रुपये किलोने विक्री केला जातो़ पंचवटी पोलिसांनी पकडलेल्या गांजाप्रमाणे पॉपीस्ट्रॉ विक्रीचेही मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या दोघांवरही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़
पोलीस उपायुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, पोलीस अधिकारी बी़ बी़ पालकर व पथकाने ही कारवाई केली़संशयित सुरेंद्र पाल सिंग