नाशिक : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु।। येथे संकरित भाजीपाला क्षेत्रातील एका सिड्स कंपनीने आयोजित केलेल्या ‘संकरित टोमॅटो - यूएस ११४३’ या विषयावरील चर्चासत्रानंतर दिलेल्या स्नेहभोजनामुळे शेतक-यांना विषबाधा होऊन एका शेतक-याचा मृत्यू, तर ६७ जण अत्यवस्थ झाल्याची घटना बुधवारी (दि़८) घडली़ अतुल पांडुरंग केदार (४१, रा़ उमराळे बु।।) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव असून, अत्यवस्थांना जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, केदार यांचा मृत्यू अन्न विषबाधेमुळे झाल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे़
दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बायर सिड्स या कंपनीने ‘संकरित टोमॅटो - यूएस ११४३’ या वानाचा पीक पाहणी कार्यक्रम व चर्चासत्राचे दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु।। येथे बुधवारी सकाळी आयोजन केले होते़ या कार्यक्रमासाठी उपस्थित सुमारे २५० ते ३०० शेतक-यांना स्नेहभोजन देण्यात आले होते, त्यामध्ये मठ्ठ्याचाही समावेश असल्याची माहिती शेतक-यांनी दिली़ या जेवणानंतर अतुल केदार यांना उलटी व चक्कर आले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने उमराळेतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तत्काळ गंगापूर रोडवरील मॅग्नम हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले़ मात्र, प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़
या चर्चासत्रानंतर शेतक-यांना देण्यात येणारे स्नेहभोजनाचे केटरिंग मालक सुनील पोपट वडजे (४७, रा. मडकीजांब, ता. दिंडोरी) यांच्याकडे होते़ स्रेहभोजनानंतर सुमारे ६७ शेतक-यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी दिंडोरी तसेच नाशिकच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ अन्नविषबाधा झालेल्यांपैकी दिंडोरी ग्रामीण रुग्णालय (१२), साईसिद्धी हॉस्पिटल (६), क्षीरसागर हॉस्पिटल (६), नाशिकमधील अपोलो हॉस्पिटल (२०), यशवंत हॉस्पिटल (१५) तर जिल्हा रुग्णालयात ८ रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत़ या सर्वांवर उपचार सुरू असून, या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़विषबाधेतील चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार