नाशिक : बँकेतून रोख रक्कम काढल्यानंतर मुलीसमवेत दुचाकीवरून घरी जात असताना पाठलाग करून हातातील बॅग खेचताना दुचाकीवरून खाली पडल्याने शिला गायकवाड या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गत महिन्यात घडली होती़ या मृत्यूस कारणीभूत ठरलेली आंध्र प्रदेशातील कुख्यात ‘पेटला’ या आंतरराज्यीय टोळीतील तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने नांदेडहून अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी सोमवारी (दि़९) पत्रकार परिषदेत दिली़ राजू प्रकाशम् पेटला (५८), शिवाजी राजू पेटला (२२), याकुब पावलू गुड्डेटी (३८, सर्व रा़ कपराल तिप्पा, रा़ कावेल्ली, जि़ नेल्लूर, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़
१४ मार्च २०१८ रोजी पार्कसाईड रेसिडेन्सीतील शिला गायकवाड (फ्लॅट नंबर १२०१) या मुलगी तक्षशिलासोबत नाशिक-पुणे रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या़ बँकेतून काढलेले दोन लाख ७० हजार रुपये बॅगेत ठेवून यामाहा फॅसीनो दुचाकीवरून (एमएच १५, एफआय ००६१) मुलगी तक्षशिलासोबत घरी जात होत्या़ त्यांच्या पाळतीवर असलेल्या पल्सर दुचाकीवरील दोन संशयितांनी नासर्डी पुलाजवळ शिला गायकवाड यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावल्याने झटका बसला व दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या़ यानंतर मुलगी तक्षशिलाने मोठ्या धाडसाने संशयितांकडून बॅग परत मिळविली व आईला उपचारासाठी दाखल केले असता सात दिवसांनंतर २० मार्चला शिला गायकवाड यांचे निधन झाले़
मुंबई नाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांना या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते़ त्यानुसार स्थानिक गुन्हेगारांची सखोल चौकशी करूनही गुन्ह्याची उकल होत नसल्याने दुसऱ्या राज्यातील गुन्हेगारांनी हा गुन्हा केल्याचा संशय बळावला़ त्यानुसार गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणच्या टोळ्या या प्रकारचे गुन्हे करीत असल्याची माहिती मिळाली़ तांत्रिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी विश्लेषण केल्यानंतर आंध्र प्रदेशातील पेटला टोळीने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार निरीक्षक वाघ व युनिटने संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता ते नांदेड, परभणी व हिंगोली परिसरात असल्याची माहिती मिळाली़
सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार वसंत पांडव, पोलीस शिपाई विशाल देवरे, विशाल काठे, दीपक जठार, स्वप्निल जुंद्रे हे पथक संबंधित ठिकाणी रवाना झाले़ या तीनही जिल्ह्यांमध्ये तीन दिवस शोध घेतल्यानंतर नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील भावसार चौकातून राजू पेटला, शिवाजी पेटला व याकूब गुड्डेटी या तिघांना ताब्यात घेण्यात आले़ या टोळीने नाशिक, नांदेड, अहमदनगर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात चो-या केल्याची माहिती असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे़ सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, नागेश मोहिते, सचिन खैरनार, जाकिर शेख, गणेश वडजे यांचा या कारवाईत सहभाग होता़ यावेळी पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते उपस्थित होते़
कामाच्या बहाण्याने घर भाडेतत्त्वावर पेटला टोळीतील संशयित हे मनमाड तसेच शिर्डी येथे काम करण्याच्या बहाण्याने घर भाडेतत्त्वावर घेऊन राहात होते़ यानंतर सकाळी कामावर जातो असे सांगून आजूबाजूच्या शहरात चो-या करीत असत़ या संशयितांना तपासासाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़- आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट एक, नाशिक.