लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामिण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समुहातील सर्व धरण निम्म्याहून अधिक भरली आहेत. गंगापूर धरणाचा जलसाठा ७७ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील काही धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी खोऱ्यावरील गंगापूर धरण समुहात काश्यपी, गौतमी, आळंदी हे तीन मध्यम प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले धरण आहेत. या धरणांमध्ये अनुक्रमे प्रत्येकी १ हजार ४३३, १ हजार २६१ आणि ८०० दलघफू इतका पाणीसाठा आहे. धरणांची क्षमता लक्षात घेता गंगापूर, काश्यपी धरण ७७ टक्के भरले आहेत तर उर्वरित गौतमी ६८ आणि आळंदी ८२ टक्के भरले आहे.तसेच पालखेड धरण समुहाची स्थितीही यंदा उत्तम आहे. कादवा नदीवरील पालखेड धरण ८० टक्के, करंजवण ४६ टक्के तर कोळवण नदीवरील वाघाड ६३ टक्के भरले आहे. उनंदा नदीवरील ओझरखेड ३० टक्के पुणेगाव ६२ टक्के आणि तीसगाव धरण १२ टक्के भरले आहे. दारणा धरणात पाच हजार ७८७ दलघफू इतका जलसाठा असून धरण ८१ टक्के भरले आहे. भावळी धरण हे मध्यम स्वरुपाचे असून १ हजार ४३४ दलघफू जलसाठा या धरणात झाला असून धरण ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. मुकणे ४३ टक्के भरले आहे.वालदेवी आणि कडवा अनुक्रमे ९३ व ८५ टक्के भरले आहेत. भोजापूर धरण ६५ टक्के भरले आहे. तसेच गिरणा खोऱ्यातील चणकापूर ६७ हरणबारी ६९, केळझर ४८ गिरणा ३१ टक्के, पुनद ५१ टक्के भरले आहे.
नाशिकची धरणे निम्म्याहून अधिक भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 10:16 PM