नाशिकचे राष्ट्रवादी भवन मिळेना! शरद पवार गटाने तंबू ठोकला; जुन्या कार्यालयावर अजितदादांचा दावा
By संजय पाठक | Published: August 19, 2023 03:13 PM2023-08-19T15:13:53+5:302023-08-19T15:14:43+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर अजित पवार आणि छगन भुजबळ गटाने ताबा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कार्यालयासाठी पर्यायी जागा शोधावी लागली आहे.
नाशिक - शिवसेनेत जे वर्षभरापूर्वी राजकारण सुरु झाले ते आता राष्ट्रवादीत होत आहे. राज्यभरात अजित पवार आणि शरद पवार गटांमध्ये राष्ट्रवादीची कार्यालये ताब्यात घेण्याची चढाओढ सुरु आहे. मुंबईत राष्ट्रवादीने दोन कार्यालये थाटली आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर अजित पवार गटाने ताबा मिळविला आहे, तर अनेक ठिकाणी शरद पवार गटाने. आता हाच वाद नाशिकमध्ये देखील दिसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर अजित पवार आणि छगन भुजबळ गटाने ताबा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कार्यालयासाठी पर्यायी जागा शोधावी लागली आहे. नाशिक शहरातच मुंबई नाका येथील किनारा हॉटेल जवळील एका मोकळ्या जागेत अस्थायी स्वरूपात शरद पवार गटाने तंबूत कार्यालय थाटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक गट सत्तेत भाजपासोबत सामील झाल्यानंतर मुंबई नाका येथील मुख्य कार्यालय ताब्यात घेण्यावरून काहीसा संघर्ष झाला होता. दोन्ही गटांनी आक्रमक भूमिका घेऊन घोषणाबाजी केली होती. मुंबई नाका येथे प्रशस्त जागेत बांधलेले अद्ययावत कार्यालय हे मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने बांधण्यात आले होते. त्यामुळे भुजबळ गटाने त्याचा ताबा सोडला नाहीय. तर शरद पवार गटाकडे दुसरा पर्याय उरलेला नाहीय.
परिणामी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयच उरलेले नाही. या गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी मुंबई नाका येथीलच आपल्या हॉटेल छानमध्ये काही बैठका घेतल्या. मात्र, पक्ष कार्यालय नसल्यामुळे आणि स्वातंत्र्यदिनी हॉटेलमध्ये ध्वजारोहण करण्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने त्यांनी पर्याय जागेचा शोध घेतला. आता मुंबई नाका येथेच तंबूमध्ये नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. लवकरच पक्षाच्यावतीने चांगले कार्यालय उभे उभारण्यात येईल, असे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी सांगितले आहे.