- अझहर शेखनाशिक, दि.22 - शहरातील ‘आॅक्सिजन हब’ म्हणून ओळखले जाणारे वनविभागाचे जवाहरलाल नेहरु वनउद्यान वरुणराजाच्या कृपादृष्टीने बहरले आहे. येथील वनसंपदा जणू उन्हाळ्यानंतर पावसाच्या सरींमध्ये न्हाऊन निघाली असून उद्यानाचे सौंदर्य खुलले असून पर्यटकांना हे हिरवे सौंदर्य खुणावत आहे. नाशिक शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नेहरु वनउद्यान हे शहराचे निसर्गवैभव आहे. येथे भारतीय प्रजातीची दुर्मीळ वनसंपदा जोपासण्यात आली आहे. सध्यस्थितीत मोठ्या संख्येने येथे भारतीय प्रजातीची वनऔषधी असून डेरेदार वृक्षराजीमुळे शहराच्या एका दिशेने विकसीत जंगलाचे अस्तित्व आहे. अंबड औद्योगिक वसाहत, पालिकेचे खत प्रकल्प केंद्र यामुळे जणू शहरात पसरणारी प्रदुषित हवा हे जंगल नैसर्गिकरित्या शुध्द करुन पुढे पाठविण्याचे काम करत आहे. ताणतणावाच्या जीवनशैलीतून अल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी नाशिककरांना हे जवळचे हक्काचे ठिकाण आहे. ‘वीकेण्ड’ला नाशिककर ‘फ्रेश’ होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात. निसर्गाच्या सानिध्यात वनभ्रमंतीची मजा पर्यटक तितक्याच आनंदाने लुटत आहे; सध्या वनविकास महामंडळाकडे वनउद्यानाचे नियंत्रण सोपविण्यात आल्याने मुख्य जबाबदारी वनविकास महामंडळावर टाकण्यात आली आहे केवळ देखभालीपुरते वनविभागाचे काही कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहे. मुख्य प्रवेशद्वारावर वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवेश शुल्क प्रत्येकी व्यक्ती दहा रुपये व वाहन शुल्क दुचाकी (५० रुपये), चारचाकी (१०० रुपये) याप्रमाणे वसुल केले जात आहेत. प्रवेश शुल्काच्या तुलनेत वाहन शुल्क अधिक असल्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वनविभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या उद्यानात यापुर्वी सर्वांना मोफत प्रवेश दिला जात होता.नक्षत्रवृक्ष संकल्पना प्रकृती, स्वभाव, आयुष्य, रोग, उपचारासाठी आरोग्यदायी नक्षत्राक र्षक सवंदेना वाहक आराध्य वृक्षांची संकल्पना लक्षवेधी आहे. कुचला, आवळा, उंबर, कृष्णागुरू, नागकेशर, वड, पिंपळ, पारिजातक, सावर, राळ, मंदार, शमी, कदंब, मोह, कडुनिंब, अर्जुन अशा भारतीय प्रजातीची वृक्षसंपदा या उद्यानात आढळून येते.असा आहे इतिहासत्रिरश्मी डोंगराच्या सर्व बाजूंनी व्यापलेले वनक्षेत्र ९४ हेक्टरचे असून महामार्गालगतच्या सैम्य उतारावर वीस हेक्टर क्षेत्रात वनविभागाने त्रिरश्मी डोंगराच्या पायथ्याशी १९८५ साली पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान विकसित केले. हे उद्यान केवळ बगीचा आहे असे नाही, तर मानवाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारे व निसर्गप्रेम वाढविणारे उत्तम ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये नैसर्गिक विसावा दुर्मीळ होत चालला आहे. मनाला शांती देणारे आल्हाददायक वातावरण असलेले शहरापासून जवळचे एकमेव निसर्गरम्य ठिकाण म्हणजे नेहरू वनोद्यान आहे. या उद्यानाला दिवसेंदीवस नाशिककरांसह आजूबाजूच्या शहरांमधील निसर्गप्रेमी नागरिकांचीही मोठी पसंती मिळू लागली आहे. त्याचप्रमाणे वनविभागाकडून आजपर्यंत सातत्याने वनोद्यानाच्या विकासासाठी केले जाणारे नावीन्यपूर्ण प्रयोग येथे येणाऱ्या नागरिकांना नेहमीच आकर्षित करत आले आहे; -------विकासकामांना गतीमनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी या वनोद्यानात बॉटनिकल गार्डन साकारण्याची संकल्पना मांडली आहे. वनमंत्र्यांकडून या संकल्पनेला ‘ग्रीन सिग्नल’ही मिळाला आहे. टाटा ट्रस्टच्या विकासक म्हणून या ठिकाणी नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवून विविध विकासकामे करणार आहेत. या अंतर्गत उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक भव्य कमान उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे येथील बालोद्यानातही आकर्षक खेळण्या बसविण्याची तयारी केली जात आहे. एकूणच टाटा ट्रस्टच्या माध्यमातून बॉटनिकल उद्यान या संकल्पनेअंतर्गत विकासकामांना गती दिली जात आहे.वनऔषधींचा अनमोल ठेवावनोद्यानात सातत्याने विविध वनऔषधी रोपांची लागवड करण्यावर भर दिला जातो. भारतीय प्रजातीची वृक्ष मोठ्या संख्येने असून, बहुतांश वृक्षसंपदा ही औषधी गुणधर्माची आहे. सुमारे २०० हून अधिक वनऔषधींचा अनमोल ठेवा या वनोद्यानात जोपासला जात आहे. वृक्षांची ओळख व्हावी, म्हणून बुंध्यांजवळ फलक लावण्यात आले आहे.
बहरले नाशिकचे ‘आॅक्सिजन हब’
By admin | Published: July 22, 2016 7:10 PM