महेश चेमटे, ठाणेठाणे महापालिकेच्या वतीने रविवारी पार पडलेल्या २७ व्या ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात नाशिकच्या संजीवनी जाधवने १५ किमीची शर्यत ५३ मिनिटे ५६ सेंकदात पूर्ण करत बाजी मारली. तर मोनिका आथरेला ५४ मिनिटे ३९ सेंकद या वेळेसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नागपूरच्या ज्योती चव्हाणने ५९ मिनिटे ३७ सेंकद अशी वेळ नोंदवत महिला गटात तिसऱ्या स्थानी झेप घतेली. त्याचवेळी पुरुष गटात अव्वल १० क्रमांकामध्ये ८ पुणेकरांनी स्थान मिळवताना वर्चस्व राखले.दरम्यान, महिला धावपटूंनी व्यक्त केलेल्या निराशेनंतर महापौर संजय मोरे यांनी आगामी ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये महिलाही २१ किमी धावणार आहेत. शिवाय महिला मॅरेथॉनची अंतिम रेषा देखील महापालिकाभवन येथेच होईल अशी माहितीही मोरे यांनी दिली.यंदाच्या मॅरेथॉनमध्येच हा बदल करण्यात येणार होता. मात्र मार्ग निश्चित झाले होते. शिवाय खेळाडूंच्या प्रवेशिका देखील आल्या होत्या. त्यामुळे आगामी मॅरेथॉनमध्ये हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. त्याचवेळी पुरुषांच्या २१ किमी अंतराच्या शर्यतीमध्ये पुणेकरांचे एकहाती वर्चस्व दिसून आले. पुण्याच्या कालिदास लक्ष्मण हिरवेने १ तास ७ मिनिटे ४ सेकंद अशी विजयी वेळ नोंदवताना जेतेपदावर नाव कोरले. तर प्रथमच मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या दुर्गा बहादूर बुधा याने अनपेक्षित कामगिरी करताना १ तास ७ मिनिटे ५ सेंकद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. चंद्रपूरच्या आर.एस.एस.एम महाविद्यालयातील पवन देशमुखने (१ तास ८ मिनिट) तिसरे स्थान पटकावले. दिग्गजांची हजेरी रिओ आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी धावपटू ललिता बाबर, रोईंग खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणारा दत्तू भोकनाळ यांची उपस्थिती यावेळी लक्षवेधी ठरली. त्याचवेळी रिओ आॅलिंपिक कांस्यपदक विजेती मल्ल साक्षी मलिकची फिजिओथेरेपिस्ट ॠचा कशाळकर यांनीही धावपटूंचा उत्साह वाढवला.जनतेसमोर मिळालेले बक्षीस प्रेरणादायीया मॅरेथॉनमध्ये यापुर्वी एक स्पर्धक म्हणून आलेल्या ललिताला आज प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले याचा खूप अभिमान वाटतो. मॅरेथोन बक्षीसांच्या रोख पुरस्कारांमध्ये वाढ झाल्यास त्याचा फायदा धावपटूंना होईल. जनतेसमोर मिळालेले बक्षीस हे नेहमीच प्रेरणादायी ठरते. - मोनिका आथरेदुसऱ्यांदा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याचा खूप आनंद आहे. स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवण्याचा मानस होता, मात्र अंतिम टप्प्यात शिल्लक अंतराचा अंदाज आला नाही. धावपटू अंतिम रेषा समोर ठेवून धावत असतो त्यामुळे अंतर दर्शक फलक दर्शनी भागात असते तर, विक्रमी वेळ नोंदवता आली असती. - संजिवनी जाधव, विजेती
नाशिकच्या संजीवनी जाधवची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2016 6:17 AM