नाशिक : गुलाबजाम बनविण्यासाठी तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकाच्या पातेल्यात पडून गंभीररीत्या भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.२९) दुपारी हिरावाडीतील (कालिकानगर) साईनाथ रो-हाउसमध्ये घडली़ स्वरा प्रवीण शिरोडे असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरावाडीतील (कालिकानगर) साईनाथ रो-हाउस नंबर चारमध्ये शिरोडे कुटुंबीय राहत असून, त्यांचा केटरिंग व्यवसाय आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आॅर्डरसाठी लागणारे गुलाबजाम बनविण्यासाठी एका पातेल्यात साखरेचा पाक तयार करण्यात आला होता. यावेळी तीन वर्षांची स्वरा ही खेळता-खेळता पातेल्याजवळ आली व गरम पाकाच्या पातेल्यात पडल्याने ती गंभीररीत्या भाजली़ शिरोडे कुटुंबीयांनी चिमुरड्या स्वराला उपचारासाठी प्रथम आडगाव शिवारातील एका खासगी रुग्णालयात नेले मात्र, त्यांनी दाखल करून घेतले नाही़
नातेवाइकांनी लागलीच जुना आडगाव नाक्यावरील खासगी रुग्णालयात स्वराला दाखल केले़ या रुग्णालयाने उपचारापूर्वीच सांगितलेली अनामत रक्कम भरून नातेवाइकांनी बाहेरून औषधेही आणून दिली़ यानंतर दुपारच्या सुमारास उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले़ यामुळे नातेवाइकांचा संताप झाला व त्यांनी उपचारातील हलगर्जीपणामुळे मुुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करून या रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते़
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.