नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना स्थानिक वाहिनीच्या कथित पत्रकारास सोमवारी (दि.16) रात्री दहा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. मायकल खरात (रा. स्वारबाबा नगर, सातपूर) असे या पत्रकाराचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार कथित पत्रकार मायकल खरात याने माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती. या महितीबाबत जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक हरिश्चंद्र पगार यांच्याकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तडजोड होऊन 20 हजार रुपये देण्याचे ठरले. तरपगार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार रात्री दहा वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सापळा लावन्यात आला होता. खरात यास लाचेची रक्कम स्वीकारताच त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.दरम्यान , रात्री उशिरापर्यंत याबाबत कारवाई सुरू होती. संशयित खरात हा प्रहार न्युज चॅनेलचा पत्रकार असल्याचे सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
नाशिक जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाकडे लाच मागणाऱ्या पत्रकारांस रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:53 PM