पुणे : अभिनेता अनुपम खेर यांच्या एफटीआयआयच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा नाट्यानंतर आता नवीन कोण? अशी चर्चा रंगली असताना या पदासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून एफटीआयआयचे माजी विद्यार्थी नसरूददीन शाह यांच्या नावाचा विचार सुरू झाला आहे.
आंतरराष्ट्रीय कामांच्या व्यस्ततेमुळे संस्थेला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचे कारण सांगत 31 आॅक्टोबर रोजी अनुपम खेर यांनी प्रशासकीय मंडळाला कोणतीही माहिती न देता थेट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले. एक वर्षच खेर यांना अध्यक्षपद भूषविता आले, या कालावधीत त्यांनी केवळ दोनदाच संस्थेमध्ये पाऊल ठेवले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष. एफटीआयआय सोसायटी स्थापनेस लागलेला विलंब तसेच ‘द अँक्सिडेंटलप्राईममिनिस्टर’ चित्रपटादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर उधळलेली स्तुतीसुमने यावरून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय त्यांच्यावर नाराज होते. या प्रकरणामध्ये केंद्राने जाब विचारल्यामुळे खेर यांनी राजीनामा देणे पत्करले असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांचा काळ असल्याने अध्यक्षपदाची नियुक्ती रखडली जाऊ नये यासाठी तातडीने अध्यक्षपदाची ही रिक्त जागा भरण्यासाठी केंद्र पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी नसरूददीन शाह यांच्या नावाचा विचार सुरू आहे. यापूर्वी एफटीआयआयचे माजी विद्यार्थी ‘शॉर्टगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनाही या पदासाठी दोनदा विचारणा झाली आहे. मात्र त्यांनी ते नाकारले आहे. नँशनल स्कूल आॅफ ड्रामा नंतर नसरूददीन शाह यांनी एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. संस्थेचे ते माजी विद्यार्थी असल्याने संस्थेच्या वातावरणाशी परिचित आहेत. अनेकदा संस्थांना भेट देऊन त्यांनीविद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या समर्थकाला हे पद देण्यापेक्षा विद्यार्थ्यांची नाळ समजणा-या नसरूददीन शाह यांना अध्यक्षपद देण्याचा विचार मंत्रालयाकडून केला जात आहे. मात्र शासकीय नोकरीपासून स्वत:ला लांब ठेवणारे शाह हे पद स्वीकारतील का खरा प्रश्न आहे.