मुंबई : ‘महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सदस्य होता’, या वाक्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला. मात्र संघाने कितीही नकार दिला, तरी हेच सत्य असून राष्ट्रवाद आणि सेक्युलॅरिझमवर विश्वास असणारे या वाक्याचा पुनरुच्चार प्रत्येक नाक्या-नाक्यावर करतील, असे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले. युनाइट इंडिया फोरमने शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.केतकर म्हणाले की, ३० जानेवारीला गांधीजींच्या हत्येला ६९ वर्षे पूर्ण होत आहेत. संघाने भिनवलेल्या हिंदुत्ववादी विचारसरणीमुळेच गोडसेने गांधीजींची हत्या केली. मात्र ती विचारसरणी आता गांधीजींच्या हत्येतील संगनमत झटकू पाहत आहे. शिवाय गांधीजींना केवळ स्वच्छतेचे पाईक ठरवून आपलेसे करण्याचा प्रयत्न होत आहे. आरएसएसचा हा सांस्कृतिक राष्ट्रवाद चुकीचा असून देशविघातक आहे. गेल्या अडीच वर्षांत हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी आरएसएसने इतर धर्मांविरोधात सुरू केलेले काम खूप पुढे गेले आहे. त्यामुळे गांधी यांना मारल्यानंतरही त्यांचे विचार जिवंत असल्याने आरएसएसने गांधींचे अवमूल्यन सुरू केले आहे....हा तर फॅसिझमचा प्रकार!राज्यसभा आणि लोकसभेच्या वाहिन्यांवरून हेडगेवार यांचा प्रचार स्वातंत्र्यसेनानी म्हणून केला जात असल्याचा गंभीर आरोप डॉ. रत्नाकर महाजन यांनी केला. ते म्हणाले की, या वाहिन्यांवरून चुकीचा इतिहास दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. हा फॅसिझमचा प्रकार असून त्याचा तीव्र विरोध करायला हवा, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘‘नथुराम गोडसे ‘आरएसएस’चाच सदस्य!’’ : युनाइट इंडिया फोरम
By admin | Published: January 28, 2017 4:03 AM