मुंबई : आपल्या वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांनी आज केलेल्या कृत्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. सदावर्तेंनी आज पत्रकार परिषद घेतली, यावेळी महापुरुषांच्या फोटोंसोबत नथुराम गोडसेचा फोटो लावला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत गोडसेचा फोटो लावल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'नथुराम गोडसेंना न्याय मिळाला नाही'यावेळी सदावर्तेंनी नथुराम गोडसेसोबत न्याय झाला नसल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, 'आपल्याला जो फोटो दिसतोय, तो नथुराम गोडसे यांचा आहे. मला या महाराष्ट्राला, देशाला, हिंदुस्तानला आणि तमाम संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगायचंय की, मी वकील होतो. संविधानाचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांच्यासोबत फाशीची ट्रायल झाली होती. नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता.'
'मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. नथुराम गोडसेंवर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळालेला नाही. आज मी नथुराम गोडसे यांचा फोटो आंबेडकर, शिवरायांसोबत लावलाय. नथुराम पळून गेले नाहीत, त्यांनी ट्रायल फेस केली. पण नथुराम यांना त्यावेळेस न्याय मिळाला नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे, मला मत मांडण्याचा अधिकार आहे', अशी भूमिका सदावर्ते यांनी मांडली.
शरद पवारांवर टीकायावेळी सदावर्तेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. 'शरद पवार, उत्तर द्या. माजी मुख्यमंत्री उत्तर द्या. तुमच्यात समर्थन किंवा विरोध करण्याचे काहीच नाही. तुम्ही किती षंढ आहात हे तुम्हाला जनता दाखवेल. औरंग्याचे प्रेम तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. शिंदे सरकार आले आणि पवारांच्या घरावरील हल्याच्या खोट्या गुन्ह्यात दाबलेल्या लोकांना पुन्हा नोकरी मिळाली. शरद पवार वैचारिक वायरस, त्यांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेऊ', अशी जहरी टीका सदावर्तेंनी यावेली केली.
'आमचे पॅनेल विजयी होणार'राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्तेंच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी सदावर्तेंनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. 'स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँक शरद पवारांची आर्थिक नाडी आहे. पवारांमुळे एकदाही या कष्टकऱ्यांना अध्यक्ष पद मिळाले नाही. या निवडणुकीत आमचे पॅनल लढणार आणि विजयी होणार,' असंही ते यावेळी म्हणाले.