हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी,ठाणे : सध्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्याने वादामुळे बंद पडलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याची माझी तयारी आहे. पण, निर्माते उदय धुरत यांच्यासोबत मी ते नाटक पुन्हा करणार नाही. नाटकाचे सर्व हक्क त्यांच्याकडे आहेत. त्यांनी ते सोडले, तर सध्याच्या काळात हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याची तयारी अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनी रविवारी दर्शवली. नाट्यसंमेलनात झालेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी नथुराम हा राष्ट्रवादी विचारांचा तरुण होता, असे सांगत हा दडपून टाकलेला इतिहास पुन्हा जिवंत करण्याची गरज व्यक्त केली. मी गांधी हत्येचे समर्थन करत नाही, पण सध्याच्या काळात देशभक्ती शिकवण्याची गरज आहे. या देशावर तुम्ही प्रेम केलेच पाहिजे, अशी सक्ती करायला हवी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे झाले, तसल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली येथे दंगा करता येणार नाही. मी तेथे असतो तर अफजलच्या नावाच्या घोषणा देणाऱ्यांना मारले असते. नुसती मुस्कटात नाही, तर त्यापुढेही जाऊन... अशी भूमिका त्यांनी घेतली.तुम्ही नथुरामचे विचार नाटकाद्वारे पोहोचविले. नथुरामने गांधीजींना नव्हे, तर जवाहरलाल नेहरूंना गोळ्या घालायला हव्या होत्या, असा संदर्भ देत एका प्रेक्षकाने यावर पोंक्षे यांना त्यांची भूमिका विचारली. ती स्पष्ट करताना गोडसेंच्या भावाशी न लिहिलेल्या किश्श्यांबाबत झालेल्या चर्चेचा हवाला देत ते म्हणाले, फाशीच्या काही दिवस आधी अंबालातील जेलरशी बुद्धिबळ खेळताना जेलरने त्यांना विचारले, ‘तुम्ही गांधींऐवजी नेहरूंना गोळ्या का नाही घातल्या.’ त्यावर गोडसे उत्तरले, ‘माझे अपुरे राहिलेले काम तुम्ही पूर्ण करा.’गांधीजींनी आत्महत्या केली नसती!सध्याच्या काळात महात्मा गांधी असते, तर देशाची ही स्थिती त्यांनाही आवडली नसती. पण, म्हणून त्यांनी साने गुरुजींसारखी गोळ्या खाऊन आत्महत्या केली नसती. कारण, त्यांचा हिंसेवर विश्वास नव्हता. उलट, ते शेवटपर्यंत जगले असते, असा अंदाजही पोंक्षे यांनी वर्तवला.रक्त न सांडलेले स्वातंत्र्यआपल्याकडे ‘बिना खड्ग बिना ढाल’ स्वातंत्र्य मिळाल्याचा अकारण डांगोरा पिटला जातो. तसे असते तर मग स्वातंत्र्यासाठी जे मरण पावले, ते कुठे गेले? त्यांचे रक्त सांडले नाही का? मग, हे स्वातंत्र्य ‘बिना खड्ग’ कसे असेल? ब्रिटिश काय बॅगा भरून तुम्ही मीठ उचलण्याची वाट पाहत बसले होते का, असा प्रश्न विचारत त्यांनी स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल प्रश्न उपस्थित केले. बौद्धिकाला कंटाळून शिवसेनेतचौथीपासून मी संघाच्या शाखेत जात होतो. तिथे दंड शिकवायचे. पण, मारायची वेळ आली की, बौद्धिके घ्यायचे. त्यामुळे कंटाळून मी शिवसेनेत आलो. कारण, या पक्षाच्या हिंदुत्वाची धार कमी झालेली नाही आणि व्हायची शक्यताही नाही. मी भाजपात गेलो नाही. कारण, हिंदुत्वाच्या भगव्याला हिरवी, निळी, पिवळी किनार देणे मला पटत नाही. अभिनेता जितेंद्र येईल!नथुराम, हिंदुत्व याबाबत प्रेक्षकांचे प्रश्न सुरू होताच पोंक्षे म्हणाले, फार प्रश्न विचारून संमेलनाचे स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणू नका. त्यांना त्यांचे काम करू द्या. नाहीतर, या विषयावर भूमिका मांडायला अभिनेते जितेंद्र येतील, असा टोला त्यांनी आव्हाड यांचे नाव न घेता लगावला. ...तर संरक्षण पुरवू : शिंदे ‘नथुराम गोडसे’ या नाटकाला शिवसेनेने आजवर वेळोवेळी संरक्षण पुरविले आहे. त्यामुळे यापुढील काळातही तशी वेळ आली तर आम्ही ते जरूर पुरवू, अशी भूमिका राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी जाहीररीत्या घेतली. हे नाटक पुन्हा सुरू करण्यासाठी वाटाघाटी करण्याची तयारी शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी दाखवली आणि त्यासाठी प्रसंगी मध्यस्थी करण्याचे जाहीर केले. त्यानंतर, शिंदे बोलत होते. वापसीसाठी पुरस्कार नाहीतमला किंवा माझ्या पत्नीला हा देश सोडून जावे, असे वाटत नसल्याचा टोला लगावून पोंक्षे म्हणाले, सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सुरक्षित वाटावे, असा हा देश आहे. मला पुरस्कारच मिळाले नाहीत, तर मी ते परत कसे करणार? अशी विचारणा करत त्यांनी पुरस्कार वापसीचा प्रश्न टोलवला.
‘नथुराम’ जिवंत करण्याचे आश्वासन !
By admin | Published: February 22, 2016 2:33 AM