- अतुल कुलकर्णीमुंबई : आवश्यकता असेल तेथे नेते आयात करण्यात गैर काहीच नाही, मात्र आत्मनिर्भर भारतासोबत आत्मनिर्भर पक्ष बनवावा लागेल, असे थेट विधान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
लोकमत यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता अशा अनेक नेत्यांना पक्षाने बाजूला ठेवले याविषयी आपली भूमिका काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, ज्यांच्या कष्टावर, श्रमावर पक्ष मोठा झाला. वाढला आणि ज्यांनी अनेक वर्ष पक्ष विस्तारासाठी काम केले, त्यांना जो पक्ष विसरून जातो, त्या पक्षाला भविष्यात अस्तित्वासाठी खूप संघर्ष करावा लागतो. जुन्या लोकांना विसरून चालत नाही. आम्ही त्याची काळजी घेतो घेत आहोत. भविष्यातही नव्याने पक्षात येणाऱ्या लोकांना कार्यक्षमतेनुसार संधी देण्यात गैर नाही. मात्र जुन्याजाणत्या अनुभवी नेत्यांचा विसर पक्षाने पडू देऊ नये. असे झाले तर पुढचे पाठ, मागचे सपाट होईल. राजकारणात हे होऊ नये, अशी आपली स्पष्ट भूमिका आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भविष्यात हीच भूमिका घेतील असेही मुनगंटीवार म्हणाले.