अतुल कुलकर्णी,मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव हे नियोजित वेळेपेक्षा ७ ते १० मिनीटे उशिरा पोहोचले. विधिमंडळाच्या इतिसाहात असे पहिल्यांदाच घडले. शिवाय, राज्यपाल संयुक्त सभागृहात आल्यानंतर ते राष्ट्रगीतासाठी उभे राहिले खरे; पण राष्ट्रगीतही काही वेळ सुरुच झाले नाही. काही सदस्यांनी राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली असताना मध्येच राष्ट्रगीताचे संगीतही सुरु झाले. या प्रकारामुळे सगळेच गोंधळून गेले. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात नियोजित वेळेनुसार राज्यपालांचे अभिभाषण ११ वाजता सुरु होणार होते. त्यासाठीची बेल वाजवली गेली. पण सभागृहात पिठासन अधिकारीच हजर नव्हते. सभापती रामराजे निंबाळकर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांच्यासह मुख्य सचिव सुमीत मलिक, विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे आणि अन्य अधिकारी विधानभवनाच्या पोर्चमध्ये राज्यपालांच्या प्रतिक्षेत उभे होते. वेळ उलटून गेल्याने सगळे अस्वस्थ झाले. दारात मुख्यमंत्री उभे असलेले पाहून ओशाळलेल्या चेहऱ्याने मंत्री आत जात होते. तर अन्य पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून आत जात होते. एक्सप्रेस टॉवर ते विधिमंडळ गेटच्या मधल्या रस्त्यात दोन्ही बाजूला वाहने उभी असल्याने वाहतुकीस अडथळे झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. शेवटी राज्यपाल आले, विधिमंडळाच्या प्रांगणात त्यांना सलामी देण्यात आली. तेथे पोलिस पथकाने राष्ट्रगीताची धून वाजवली आणि सगळे सभागृहात गेले. पण सभागृहातील ध्वनिक्षेपकावर राष्ट्रगीतच सुरू झाले नाही. शेवटी सदस्यांनीच राष्ट्रगीत म्हणायला सुरूवात केली.पण मध्येच राष्ट्रगीताचे संगीत सुरू झाले. सगळाच गोंधळ!सभागृहात राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे हे दोन्ही विरोधीपक्ष नेते ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे’ असा मजकूर लिहीलेल्या टोप्या घालून बसले होते. राज्यपालांचे भाषण जसे संपत आले तसे विरोधी बाकावरुन कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरु झाल्या. हेडफोन लावून अनुवाद ऐकलाराज्यपालांनी इंग्रजीत भाषण केले; त्याचा अनुवाद मराठीत चालू होता. तो हेडफोन लावून ऐकणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यात अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मंत्र्यांचाही समावेश होता. राज्यपालांचे भाषण सुरू असतानाच सभापती निंबाळकर यांनी खिशातील मोबाईल काढून एसएमएस पहाणे सुरु होते. संपूर्ण सभागृहात भाषणाचे मुद्दे लिहून घेणारे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे एकमेव मंत्री होते.
राष्ट्रगीताला विलंब; राज्यपालांना उशीर
By admin | Published: March 07, 2017 4:47 AM