कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंतचा प्रवास...त्या प्रवासात भेटलेल्या गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या आणि बदलत्या माणसांच्या कहाण्या! NH44३७४५ किलोमीटर्स, ११ राज्यं, ३५ दिवस, ३४ रात्री आणि ७ कलंदर भटके..जागतिकीकरणानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षांतल्या भारताने कित्येकांच्या स्वप्नांना पंख दिले... किती जण पुढे घुसले, कित्येक मागे ढकलले गेले. किती गोष्टी बदलल्या, कित्येक रखडल्या...काय बदललं आणि किती बिघडलं, काय पेटलं आणि कोण विझलं यांचा हिशेब मांडण्यासाठी आम्ही उतरतो आहोत अख्ख्या देशाच्या हृदयातून धावत भारताचं दक्षिण आणि उत्तर टोक जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या राजमार्गावर..रस्ता फक्त रस्ता कुठे असतो?तो असतो माणसांच्या आयुष्यातून धावणारा, अवतीभोवतीचे धावते बदल टिपणारा,पुढे जायच्या घाईत मागे राहून गेलेल्यांच्या स्वप्नांचे ढीग मागे लोटणारा, आणि प्रगतीच्या कहाण्यांचे फलक मैलामैलांवर रोवणारा, बदलाचा साक्षीदार! बदलत्या गतीचं वारं पीत बेभान तोऱ्यात धावणारा, रखडल्या योजनांच्या खड्ड्यखुड्ड्यांनी घायाळ होत कुचंबलेला रस्ता!- धावत्या देशाच्या धडधडत्या नाडीवर बोट ठेवून असलेला जागल्याच जणू!
-------