नागपूर - गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांच्या व्यसनाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चिला जात आहे. तसेच व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी योग मंत्र दिला आहे. जो योगयुक्त राहील तो नशामुक्त राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेला सुरुवात झाली आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार आहे. या परिषदेला सुरुवात होण्यापूर्वी लोकमतशी संवाद साधताना बाबा रामदेव म्हणाले की, जो योगयुक्त राहील तो रोगमुक्त, नशामुक्त, हिंसाआदिपासून मुक्त राहील. त्याला स्वप्नातही नशा करण्याची इच्छा होणार नाही. नैराश्य येणार नाही. माझे वडील, आजोबा यांना तंबाखू खाण्याचे व्यसन होते. मी त्या दोघांचेही व्यसन सोडवले. त्यावेळी मी १२-१५ वर्षांचा होतो.
यावेळी या परिषदेबाबत बाबा रामदेव म्हणाले की, एकता, अखंडता, समानता राहो, माझ्या देशात चरित्राची महानता राहो. देशातील प्रत्येक नागरिक महान होईल, तेव्हा हा माझा भारत महान होईल. समानतेचा विचार परिषदेतून समोर येईल आणि समाज पुढे जाईल, असा विश्वास रामदेव बाबा यांनी व्यक्त केला.