नागपूर - सर्व धर्म, सांप्रदायाचा सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ सर्वधर्म समभाव आहे. धर्मनिरपेक्षता नाही. सर्वांचा सन्मान करणं हा जीवनाचा दृष्टीकोन आहे. धर्म शब्दाबाबत आपल्याकडे गोंधळ आहे. कुणी म्हणतं मी पत्रकारिता धर्माचं पालन करतो, कुणी म्हणतं मी शिक्षिकी धर्मांचं पालन करतो मग हे धर्म कोणते? कर्तव्य करणं हे धर्म आहे. भारतात विविधता असली तरी आपला राष्ट्रधर्म एक आहे. आपल्या संत-महात्मांनी जे मार्गदर्शन केले ते मुल्याशी निगडीत आहे असे स्पष्ट विचार केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी मांडले.
लोकमत वृत्तपत्राच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त नागपूर येथे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हानं आणि भारताची भूमिका या विषयावर कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, आजचा दिवस नागपूरच्या इतिहासातील खास दिवस आहे. विजय दर्डा यांनी अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली. सर्व धर्मातील प्रमुख लोकांना एकत्र आणत लोकप्रबोधन करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल कौतुक आहे. विशेष म्हणजे हे सभागृह बांधताना सभागृहाची संपूर्ण लाईट सोलारवर ठेवली होती हे वैशिष्ट आहे. त्या सभागृहात कार्यक्रम होतोय याचा आनंद आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आज खऱ्या अर्थाने खूप चांगले मार्गदर्शन झाले. मी अनेकदा वामनराव पै यांच्याकडे गेलो. त्यांच्या प्रार्थनेत सगळं काही आलं. विश्वाचं कल्याण कर असं प्रार्थनेत म्हटलं आहे. फक्त भारतीयांचे कल्याण कर असं म्हटलं नाही. माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे. माझा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आलो नाही. कुठल्याही देवाची पूजा केली तर त्याची श्रद्धा एकाच ईश्वराला मिळते. सर्वांनी एक विचार कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवले. आमचे विचार, धर्म, सांप्रदाय वेगवेगळे असू शकतात परंतु सहिष्णुता हेदेखील एक मुल्य आहेत. सर्व गोष्टीचं अध्ययन करून जीवन समृद्ध करण्याचा मार्ग शोधायला हवा असं नितीन गडकरींनी सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमाची कल्पना खूप चांगली आहे. उपासना पद्धती वेगळ्या असली तरी भावार्थ आणि आपलेपणा एक आहे. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. त्यामुळे भारत विश्वगुरू बनण्याची ताकद ठेवतो. भारतीय संस्कृती सर्व धर्मापासून मिळालेल्या मुल्यावर आधारित आहे. त्याचआधारे शिक्षण पद्धती सुरु आहे. याच संस्काराने भारताची पुढील पिढी घडत आहे. पवित्र नद्यांचा संगम होतो तसा या कार्यक्रमानिमित्त सर्व विचारांचा संगम इथं झालं. जीवनात चांगले कार्य, राष्ट्रकार्य करण्याची शक्ती सर्व धर्मगुरुंकडून मिळो हीच अपेक्षा असल्याचा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.
आणखी वाचा
...म्हणून मला नितीन गडकरींचे 'वजन' कमी करायचेय; रामदेव बाबांनी केली स्तुती
"दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे, येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो"