सांगली : सांगलीत साठाव्या राष्ट्रीय शालेय १९ वर्षांखालील लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. स्कूल फेडरेशन आॅफ इंडिया, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा २३ ते २५ एप्रिल दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल व आमराई क्लब या दोन ठिकाणी होणार आहेत. गुरुवारी (दि. २३) सकाळी नऊ वाजता आमराई क्लब येथे आ. सुधीर गाडगीळ व उगार शुगर वर्क्सचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आहेत. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने ८० लाख रुपये खर्चून क्रीडा संकुलमध्ये लॉन टेनिसची सहा मैदाने बांधली आहेत. आमराई क्लबमध्ये अद्ययावत मैदान उभारले आहे. खेळाडूंची ने-आण करण्यासाठी व्यवस्था केली आहे. खेळाडूंच्या निवास व भोजनाचीही उत्तम व्यवस्था केली आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण २५ एप्रिलला सायंकाळी सात वाजता खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते आमराई क्लबमध्ये होणार आहे. महाराष्ट्राचा संघमुले : आदित्य गोखले (पुणे), महंमद अलीसागर (नागपूर), वंशल डिसुझा (मुंबई), हर्षल भरणे (लातूर), इंद्र पटवर्धन (पुणे). मुली : आस्था धरगुडे (मुंबई), सुप्रभा पुजारी (पुणे), प्रगती सोलणकर (पुणे), अपूर्वा रोकडे (नाशिक), मीरा पटवर्धन (पुणे). संघ व्यवस्थापक : प्रा. डॉ. जगदीश झाडबुके.
सांगलीत आजपासून राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा
By admin | Published: April 22, 2015 11:34 PM