लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आयआयटीमध्येच शिकायला जायचे हे ध्येय त्याने दहावीनंतरच निश्चित केले होते. कॉलेज, क्लास आणि दररोजचा ७ ते ८ तास अभ्यास याला एकही दिवस सुुटी दिली नाही. टीव्ही, चित्रपट, क्रिकेट मॅच यापासून तो ठरवून दूर राहिला, केवळ अभ्यासावरच त्याने लक्ष केंद्रित केले. रविवारी निकाल जाहीर झाला अन् अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेमध्ये तो देशात दुसरा आणि राज्यात पहिला आला. अक्षतने पुण्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे. अखेर दोन वर्षांतल्या या खडतर मेहनतीचे फळ मिळाल्याची भावना अक्षत व त्याच्या परिवाराच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होती. ‘लोकमत’च्यावतीने संपादक विजय बाविस्कर यांनी अक्षतचा सत्कार केला. आयआयटीमधल्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेशपरीक्षेचे आयोजन केले जाते. अक्षतच्या यशाबद्दल भरभरून बोलताना त्याची आई रितू चुघ म्हणाल्या, ‘‘शाळेमध्ये अगदी केजीपासूनच अक्षत हा प्रत्येक परीक्षेला टॉप राहत आलेला आहे. आम्ही मूळचे पंजाबी; मात्र अक्षतच्या वडिलांच्या नोकरीनिमित्ताने जयपूरला जावे लागले. अक्षतचे सहावीपर्यंतचे शिक्षण जयपूरला झाले, त्यानंतर त्याच्या वडिलांची पुण्याला बदली झाली. सातवीला त्याने पुण्यातील दिल्ली पब्लिक स्कूलला प्रवेश घेतला. तिथेच त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अक्षतला अभ्यास कर, असे कधीही सांगावे लागले नाही. तो स्वत:हून अभ्यास करायचा. आम्ही त्याला कधीतरी बाहेर फिरायला जाऊयात असे म्हणालो, तरी तो यायचा नाही. मागील दोन वर्षे त्याने पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. बॉम्बे आयआयटीमध्ये कम्प्युटर सायन्स करायचे हे त्याने ठरविलेले होते. आजच्या निकालामुळे त्याची ती इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे.’’अक्षतचे वडील टाटा स्काय कंपनीचे उपाध्यक्ष आहेत, तर आई गृहिणी आहे.
पुण्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर
By admin | Published: June 12, 2017 1:48 AM