नाशिक : जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़९) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्हा न्यायालयाने इतिहास रचत आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत राज्यात सर्वाधिक दावे निकाली काढण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या आवाहनाला पक्षकारांनी प्रतिसाद देत २६ हजार ३७९ प्रकरणांमध्ये तडजोड करून आपसातील वाद मिटविला आहे़ यामध्ये दावा दाखलपूर्व २२ हजार ६७८ प्रकरणे तर न्यायालयातील ३ हजार ७०१ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे़ विशेष म्हणजे या राष्ट्रीय लोकअदालतीत २६ कोटी रुपयांच्या तडजोड रकमेची वसुली झाली आहे़
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी जुलैमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ही पहिलीच राष्ट्रीय लोकअदालत होती़ वर्षानुवर्षांपासून न्यायालयात खेटा मारणाºया पक्षकारांना आपसात समझोता करण्यासाठी लोकअदालतीच्या सुवर्णसंधीचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयांना भेटी दिल्या़ न्यायाधीश, वकील, पक्षकार यांच्यासमवेत बैठका घेऊन लोकअदालतीचे फायदे समजून सांगितले़ न्यायालयातील भूसंपादन प्रकरणांबाबत जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी तर महापालिकेतील प्रकरणांबाबत आयुक्त व अधिकाºयांसोबत बैठका घेतल्या़
न्यायालयातील मोटार अपघात प्रकरणांमध्ये विमा कंपन्यांचे अधिकाºयांसमवेत बैठका घेऊन त्यांना प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्याचे आवाहन केले़ न्यायालयांमध्ये दिवसेंदिवस दाखल होणारी प्रचंड प्रकरणे, न्यायाधीशांची अपुरी संख्या यामुळे पक्षकारांना वर्षानुवर्षे न्यायासाठी तिष्ठत बसावे लागते़ मात्र लोकअदालतीत वादी व प्रतिवादी दोघांना उपस्थित राहून तडजोडीने आपले प्रकरण मिटविण्याची संधी मिळते़ यामुळे एकाच दिवसात वाद तर मिटतोच शिवाय कोर्टच्या चकरा मारण्यापासून सुटकाही मिळते़ लोकअदालतीच्या जनजागृतीमुळे शनिवारी जिल्हा न्यायालयात तडजोडीसाठी सुमारे २० हजार पक्षकार उपस्थित होते़
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर बुक्के, जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी यांनी रात्रंदिवस परिश्रम करून पक्षकारांना नोटिसा काढल्या़ तसेच नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी पक्षकारांना नोटिसा बजावण्याचे महत्त्वाचे काम केले़ याबरोबरच जिल्हाभरातील वकील व पक्षकारांनी केलेल्या सहकार्यामुळे राष्ट्रीय लोकअदालतीत सव्वीस हजार दावे निकाली काढण्यात यश मिळाले आहे़
झटपट न्यायन्यायासाठी वर्षानुवर्षे तिष्ठत बसलेल्यांसाठी राष्ट्रीय लोकअदालत ही सुवर्णसंधी असून, पक्षकारांनी याचा लाभ घेतला आहे़ यापुढील लोकअदालतींनाही पक्षकारांना चांगला प्रतिसाद दिल्यास न्यायालयावरील ताण कमी होईलच शिवाय न्यायही झटपट मिळेल़ न्यायाधीश, वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच नाशिक जिल्हा न्यायालयाने २६ हजार दावे निकाली काढण्यात यश मिळविले असून, हा एक इतिहासच आहे़- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश