- संतोष सस्ते
मुंबई हे अन्य शहरांच्या तुलनेत एक अविश्रांत, न थांबणारं, नेहमीच धावणारं असं शहर आहे. लोकसंख्येची घनता मुंबईत सर्वांत जास्त आहे. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे मुंबई शहराला फिल्टर करणारं नैसर्गिक यंत्रच मिळालं आहे. संपूर्ण जगात शहराला लागूनच घनदाट जंगल असणारं हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. वेगवेगळ्या प्रकारची जैविक विविधता येथे आढळते. उद्यानात ८00 प्रकारच्या वृक्षप्रजाती, ४0 सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, २५0 पक्ष्यांच्या प्रजाती, ३८ सरपटणाऱ्या आणि उभयचरांच्या तसेच २00 फुलपाखरांच्या प्रजातीजाती आहेत. यावरून राष्ट्रीय उद्यानात वन्यजिवांचा जपण्यात आलेला वारसा आपणास लक्षात येतो.१९५0ला मुंबई राष्ट्रीय उद्यान कायद्यांतर्गत सुमारे २0 चौ. कि.मी. परिसरात कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली; तसेच १९६८ साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने ६८.२७ चौ. कि.मी. इतक्या क्षेत्रफळाचे बोरीवली राष्ट्रीय उद्यान निर्माण करण्याची शिफारस केली. त्या शिफारशीनुसार १९७६ साली राज्य सरकारने मुंबई उपनगर व ठाणे जिल्हा यामध्ये विस्तारित असणाऱ्या बोरीवली राष्ट्रीय उद्यानाची घोषणा केली. १९८१ साली बोरीवली राष्ट्रीय उद्यानाचे ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली’ असे नामकरण झाले. १९९६ साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ १0३.८४ चौ. कि.मी. आहे.या ठिकाणी येणारे पर्यटक हे केवळ मनोरंजनासाठी किंवा साप्ताहिक सुटी घालवण्यासाठी येतात. या पर्यटकांचा कल वनराणी (मिनी ट्रेनसफारी), नौकाविहार, बालोद्यान इत्यादींकडे असतो. यात शाळांच्या सहली, प्रभातफेरी, कौटुंबिक सहली, ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम इत्यादींचा समावेश होत असतो. खरेतर, पार्कमध्ये निसर्ग पर्यटनासाठीचे असे व्यवस्थापन अपेक्षित असते. उद्यानात पर्यटकांसाठी व्याघ्र व सिंहविहार, निसर्ग पायवाट भ्रमण, वन्यजीव फोटोग्राफी स्पर्धा, वन्यजिवांवर आधारित चित्रकला स्पर्धा, पक्षी निरीक्षणसहली, लहान मुलांसाठी लिटल मोगलीसारखे उपक्रम राबवण्यात येत असतात. निसर्गाशी निगडित अशा कार्यशाळा घेतल्या जातात. पक्षी निरीक्षण व जंगल सफारीचे आयोजन केले जाते. तसेच माहिती केंद्रामध्ये विविध उपक्रमांद्वारे निसर्गाचे जतन व संरक्षणाची प्रेरणा दिली जाते. त्याचबरोबर कॅम्प शेड निर्माण करून पर्यटकांसाठी तंबू निवास येथे निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे निसर्गाबद्दल जागृती निर्माण व्हावी हा हेतू आहे. राष्ट्रीय उद्यान ही राष्ट्राची अमूल्य अशी नैसर्गिक संपत्ती आहे. तिचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. पर्यटकांनी पर्यटन करताना जंगलाचे संवर्धन मूल्य कमी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
(लेखक बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) आहेत.)