ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - गतविजेती आणि अव्वल मानांकीत जोश्ना चिनप्पा, दिपिका पल्लीकल आणि सचिका इंगळे या अव्वल तीन खेळाडूंसह गोव्याच्या चौथ्या मानांकीत आकांक्षा साळुंखेने ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटाची उपांत्य फेरी गाठली. तत्पूर्वी, झालेल्या उप - उपांत्यपुर्व फेरीत सचिकाने ०-२ अशा पिछाडीवरुन जबरदस्त पुनरागमन करताना थरारक विजय मिळवला.मुंबईतील ओट्टर्स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या सचिकाने उप - उपांत्यपुर्व लढतीत झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ऐश्वर्या भट्टाचार्याने पहिले दोन सेट जिंकताना अनुभवी सचिकाला दबावाखाली ठवेल होते. मात्र यानंतर सचिकाने आपला सर्व अनुभव पणास लावताना सलग तीन सेट जिंकताना १३-१५, ९-११, ११-७, ११-०, १४-१२ अशी शानदार बाजी मारत उपांत्यपुर्व फेरी गाठली.उपांत्यपुर्व फेरीत सचिकाने मिळालेली लय कायम राखताना आक्रमक खेळाच्या जोरावर सचिकाने दिल्लीच्या अद्या अडवानीचा ११-५, ११-४, ११-८ असा धुव्वा उडवून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या तामिळनाडूच्या चिनप्पानेही आपल्या लौकिकानुसार सहज आगेकूच करताना यजमान महाराष्ट्राच्या जुई कलगुटकरचे आव्हान ११-५, ११-६, ११-४ असे संपुष्टात आणले.दुसरीकडे, तामिळनाडूच्याच दिपिकाने आपल्या दिर्घ अनुभवाच्या जोरावर आपल्याच राज्याच्या लक्ष्या रागवेंद्रनला ११-३, ११-४, ११-४ असे सहजपणे नमवले. तर गोव्याच्या आकांक्षानेही पहिल्या सेटमध्ये मिळालेल्या कडव्या झुंजीनंतर एकहाती वर्चस्व मिळवताना महाराष्ट्राच्या उर्वशी जोशीला १२-१०, ११-९, ११-५ असा धक्का देत उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली. (क्रीडा प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्क्वॉश, चिनप्पा, पल्लीकल उपांत्य फेरीत
By admin | Published: July 15, 2016 8:51 PM