- सचिन अडसूळ (जिल्हा माहिती अधिकारी)
आज आपण युवा दिन साजरा करत आहोत. भारत देश युवकांचा देश, तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह सुद्धा साजरा केला जात आहे. या दोन्ही विषयांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर रस्ते अपघातामधे दरवर्षी देशात मृत्यूमुखी पडणाऱ्या दीड लक्ष लोकांमधे 18-45 वयोगटातील संख्येची सरासरी 67 टक्के आहे. वाहन चालविणे या प्रकारात युवक जास्त असतात. युवकांवरील वाढत्या जबाबदाऱ्या याचे कारण यात देता येईल. मुळात देशाचा अर्थिक गाडा चालविण्यासाठी त्यांचाच वाटा महत्त्वाचा आहे. मग या प्रक्रियेत स्वत:च्या जीवाची किंमत शून्य का? काही छोट्या छोट्या घटकांचा विचार न करता प्रवास करणे किती जीवावर बेतू शकते याचे ज्ञान जगप्रसिद्ध बुद्धिमान भारतीय युवकांना का नाही? धकाधकीच्या युगात आजचा तरूण स्वत:च्या आरोग्यावर, ताणतणावांवर लक्ष केंद्रीत का नाही करीत, याचाही विचार होणे गरजेचे आहे. फक्त मौज-मस्तीमधे जास्त वेगाने गाडी चालविताना झालेल्या अपघातांची संख्या आणि कामांचा वाढता ताण, धावपळीची जीवनशैली यांचाही विचार करायला हवा. म्हणून आजही अनुभवी लोक सांगतात की, जीवनाचे महत्व मोठे आहे. आजचा तरूण खुप वेगाने प्रगती करीत आहे. जरा थांबा, विचार करा, मग पुढे जात राहा. आपली गती कमी करा. यामधे खुप सारे विचार दडलेले आहेत.
आजच्या तरूणाईला जीवन जगताना सर्वच गोष्टी फार जलद हव्यात आणि तिच सवय कामात, दैनंदिन व्यवहारात झाली आहे. यामुळे सोबतीला असलेल्या कुटुंबातील सहकाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो तर कधी कामाच्या ठिकाणी नाहक त्रास सोबतींना भोगावा लागतो. यातूनच नवे प्रश्न समोर येवून उभे राहतात. मग अशात रस्ते अपघातही आलाच. डेडलाईनच्या नावाखाली आजची तरूणाई गतीमान झाल्याचे चित्र आहे. परंतू रस्ते, घर व कामाची ठिकाणे या ठिकाणी त्याचे परिणाम आपल्याला अनिष्ठ स्वरूपात भोगावे लागत आहेत. जगात दर रस्ते आपघत मृत्यूंपैकी एक मृत्यू भारतातील आहे. देशात आपघातांची संख्या व त्यातून होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2010 साली 100 अपघातांमधे सरासरी 20 जण दगावत. तोच आकडा आज 10 वर्षांनंतर 37 वर पोहचला आहे. अपघात व मृत्यूचे प्रमाण दरवर्षी वाढताना दिसत आहे. याचा विचार प्रशासन करीत आहे. मात्र यासाठी सर्वात जास्त जबाबदार तरूणाई काय करतेय? त्यांनी किमान छोट्या पण महत्त्वाच्या बाबी विचारात घ्यायला हव्यात. यात दुचाकी असेल तर हेल्मेट, कार असेल तर सीटबेल्ट, आवश्यक आणि नियमानुसार वाहनाची गती हे तंत्र आत्मसात करायला हवे.
सन 2030 पर्यंत जगात एकूण मृत्यू होतील त्यामधे रस्ते अपघातातून झालेल्या मृत्यूचा क्रम हा 5 व्या क्रमांकाचा असेल असे म्हटले जाते. म्हणून आपण भारताचे भविष्य घडविणारी पिढी या नात्याने रस्ते नियम माहित असणे व ते पाळणे गरजेचे आहे याचा स्विकार करणे गरजेचे आहे. लहान मुलांना वाहन चालविण्यापासून मज्जाव करणे, हेल्मेट सीट बेल्टचे महत्त्व याचबरोबर नियम, सूचना फलकांचा अभ्यास व आपत्तीजनक स्थितीत करावयाची उपाययोजना यांचा अंगिकार करायला हवा. हे केले तर निश्चितच आपण रस्ते आपघतामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 85 टक्के मृत्यू टाळू शकतो. आपल्या वाहनाच्या आतील बाजूस किमान आवश्यक मदत दूरध्वनी यात पोलीस 100, फायर 101, रूग्णवाहिका 108, 102, राष्ट्रीय महामार्ग मदत 1033 व आपत्ती व्यवस्थापन मदत 1078 दर्शनी भागात लावलेले असावेत. म्हणजे कुटुंबातील किंवा सहप्रवाशांना तातडीने मदत मागता येईल.
आजच्या तरूणाईला भरारी घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. परंतू नेमकं जीवनाचे उद्दिष्ट आपण विसरत चाललो आहे. पैसा महत्त्वाचा की आयुष्य यावर विचार व्हावा. देशाचे भविष्य असणारी तरूणाई यावर नक्कीच विचार करेल. आज रस्ते परिवहन विभाग अनेक प्रकारे रस्ते सुरक्षा सप्ताहातून सर्वच वयोगटाला नियमांचे धडे व जबाबदाऱ्या जनजागृतीमधून पटवून देत आहेत. त्यांचा स्विकार आपण करूया कारण एक अपघात कित्येक कुटुंबे उद्धस्त करतो, याची प्रचिती ज्याने भोगले आहे, त्यालाच येते. यातून आपण धडा घेऊया तरूणाई रस्ते अपघात टाळण्यासाठी योगदान देईल, या उद्देशाने युवा दिनाच्या आपणाला शुभेच्छा.