देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीला मंदी हा शब्द लावणे योग्य नाही असे जाणकार अर्थतज्ज्ञांचे मत आहे. मंदी कशाला म्हणायचे याचे काही निकष अर्थशास्त्राने निश्चित केले आहेत. सध्याची परिस्थिती त्या निकषात बसत नाही असे ते म्हणतात. मंदी ऐवजी स्लो डाऊन हा शब्द योग्य आहे असे त्यांचे म्हणणे. इंग्रजीमध्ये स्लो डाऊन, रिसेशन, डिप्रेशन असे स्वतंत्र शब्द विशिष्ट आर्थिक परिस्थितीची ओळख करून देताना वापरतात. मराठीत असे स्वतंत्र शब्द नाहीत.
तथापि, कुठलाही समाज काटेकोर व्याख्येत बोलत नाही. अगदी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत देशातही शब्दापेक्षा त्यामागची भावना लक्षात घेऊन लोकव्यवहार चालतो. स्वतःची आर्थिक स्थिती अपेक्षेइतक्या वेगाने सुधारत नसली तर मंदी आली आहे, असेच सामान्य माणूस म्हणतो. हे भावनात्मक वर्णन असते. समाजाची ही सवय लक्षात घेतली तर सध्याच्या परिस्थितीचे वर्णन मंदी असेच करावे लागते.या मंदीचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होईल का हा सध्या चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मागील पाच वर्षांत लोकांच्या जीवनमानात लक्षणीय फरक पडला असे काहीही फडणवीस सरकारकडून झालेले नाही. परकीय गुंतवणुकीसारख्या काही क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी ही आघाडी गेल्या कित्येक वर्षांतील कारभाराचा परिणाम आहे. त्यात फडणवीस सरकारचे कर्तृत्व फार नाही. उलट गुंतवणुकीचे प्रमाण घटलेले आहे. महाराष्ट्रातील राहणीमान सुधारले, त्याचा दर्जा वाढला, मूलभूत सोयीसुविधा मुबलक व सुलभ मिळू लागल्या असा नागरिकांचा अनुभव नाही. रोजगार वाढलेला नाही. गावातील तरूण शहरात आले तर त्यांना नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. शहरातील तरूणांनाही नोकरी मिळविणे सुलभ झालेले नाही. शहरात नवे घर घेणे अशक्य झाले आहे.
पाणीपुरवठा, शहरी वाहतूक, आरोग्यसेवा यामध्ये गुणात्मक फरक पडलेला नाही. शेतीचे उत्पादन वा शेतमालाचे भाव यामध्ये फार वाढ झालेली नाही. जलशिवारसारख्या काही योजनांमध्ये फडणवीस सरकारने चांगली कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री आपल्या प्रचारसभेत केलेल्या कामांची जंत्री देतात आणि महाराष्ट्र कसा आघाडीवर आहे हे कळकळीने सांगतात. तरीही शहरी मध्यमवर्गाच्या डोळ्यात भरेल अशी कोणतीही कामगिरी फडणवीस सरकारला करता आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात अलिकडे आलेली मोठी गुंतवणूक सांगा, असा प्रश्न लोकमतकडून विचारला गेला असता मुख्यमंत्र्यांना उत्तर देता आले नव्हते.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कालखंडाचे चित्र याहून वेगळे नव्हते. त्यावेळीही काही चांगली कामे होत असली तरी सरकारने रेटा लावून काही बदल घडवून आणला अशी उदाहरणे नव्हती. काहीशा तशाच पद्धतीने फडणवीस सरकारने गाडा पुढे चालू ठेवला.मात्र दोन गोष्टींमध्ये मागील सरकार व फड़णवीस सरकार यांच्यात फरक करता येतो आणि याच फरकावर भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा जोर असणार आहे हे नासिकच्या सभेतून लक्षात येते. या दोन गोष्टी म्हणजे राष्ट्रवादाचा प्रभावी परिणाम आणि भ्रष्टाचाराचा कलंक नसलेले सरकार. याच दोन अस्त्रांचा वापर करून नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक भाजपाला अनुकूल करून घेतली. आता तीच दोन अस्त्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात वापरीत आहेत.सरकारवर डाग पडता कामा नये असे नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितले होते आणि मी तसा कारभार करून दाखविला. असे देवेंद्र फडणवीस यांनी नासिकच्या सभेत जनसमुदायाला सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी नेत्रदिपक कामगिरी करून दाखविली नसली तरी त्यांच्या कारभारावर भ्रष्टाचाराचा डाग नाही ही बाब लोकांसाठी फार महत्वाची आहे. मोदी, शहा, फडणवीस या नेत्यांबद्दल लोकांशी बोलताना एक गोष्ट नेहमी लक्षात येते. हे नेते कारभारात अनेकदा कमी पडतात हे लोकांना जाणवते, पण हे नेते स्वतःची धन करून घेत नाहीत, जे काही करतात ते देशासाठी किंवा पक्षासाठी प्रामाणिकपणे करतात, अशी बहुसंख्य नागरिकांची भावना आहे.
लोकांच्या मनातील या भावनेला राष्ट्रवादाची फोडणी भाजपाने खुबीने दिली आहे. लोकसभेच्या काळात बालाकोट घडले. आता काश्मीर आहे. तिहेरी तलाक आहे. काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याकडे प्रशासकीय निर्णय म्हणून भाजपा पहात नाही तर देश एकसंघ होण्याच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा असे त्यांचे वर्णन केले जाते. काश्मीरमध्ये सध्या नागरी स्वातंत्र्य नाही. पण त्याला मोदी सरकारपेक्षा काश्मीरी जनता जबाबदार आहे असे सर्वसामान्य जनतेचे मत आहे किंवा तसे मत बनविण्यात भाजपा यशस्वी झाला आहे. देशहितासाठी कठोर निर्णय घेण्यास न कचरणारा नेता अशी मोदींची ओळख लोकसभा प्रचारातून सुरू झाली. ती अद्याप कायम ठेवली जात आहे. नासिकच्या सभेत फडणवीसांनी केलेले मोदींचे वर्णन असेच होते. अशा कणखर नेत्याचा, स्वच्छ कारभार करणारा प्रामाणिक चेला अशी स्वतःची ओळख फडणवीस जनतेला खुबीने करून देतात. मोदीही त्याला दुजोरा देतात. आणि जनतेवर त्याचा प्रभाव पडतो. निर्णय घेण्यामागे नेत्याचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नाही हे जनतेला पटले तर चुकीच्या निर्णयालाही जनता माफ करते. जनतेचे हा स्वभाव मोदी व फडणवीस यांना चांगला ठाऊक झाला आहे. प्रामाणिक नेता अशी ओळख पटलेल्या नेत्याने राष्ट्रवादाची गोळी दिली तर जनतेवर त्याचा परिणाम अधिकच होतो हेही या दोघांना ठाऊक आहे. इंदिरा गांधींनी हा प्रयोग १९७१मध्ये केला. बांगला देश युद्धानंतर राष्ट्रवादाची भावना चेतवून त्यांनी अफाट लोकप्रियता संपादन केली. याच राष्ट्रवादाची मात्रा वापरून त्यांनी काही धाडसी निर्णय घेतले. त्यातील काही चुकले आणि त्याची किंमत देशाला चुकवावी लागली. परंतु, इंदिराजींची लोकप्रियता कमी झाली नाही. आणीबाणी लागू करण्याची घाई त्यांनी केली नसती आणि आणीबाणीत नसबंदीसारख्या मोहिमा झाल्या नसत्या तर १९७७च्या निवडणुकीतही इंदिरा गांधींचा विजय झाला असता. कारण इंदिरा गांधींच्या राष्ट्रवादाबद्दल जनतेच्या मनात संशय़ नव्हता.
सध्याच्या भाजपा-विरोधी नेत्यांच्या राष्ट्रवादाबद्दलही जनतेच्या मनात संशय नाही. परंतु, त्यांनी केलेल्या कारभाराबद्दल संशय आहे. म्हणूनच मोदी किंवा फडणवीस हे भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा दाखला वारंवार देत आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आपल्याला यश आलेले नाही हे मोदी-फडणवीस यांना पक्के माहित आहे. परिस्थिती कशी बदलेल याबद्दल नरसिंहराव किंवा मनमोहनसिंग यांच्याप्रमाणे योग्य उपायही मोदींकडे नाही हे रोज घाईघाईत घेतल्या जाणार्या निर्णयांमुळे लक्षात येत आहे. परंतु, आमचे हेतू स्वच्छ आहेत व आमची धडपड प्रामाणिक असल्यामुळे आर्थिक दुःस्थितीवर उपाय शोधण्यासाठी आम्हाला आणखी एक संधी द्या, असे जनतेला आडवळणाने सांगण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या मनातील राष्ट्रवादाच्या भावनेला चेतविण्यात येत आहे.
स्लो डाऊनवरून लोकांचे लक्ष उडविण्यासाठी आणि आर्थिक अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग भाजपा करून घेत आहे हा विरोधकांचा आरोप खरा आहे. पण जनतेच्या हे लक्षात येत नाही असे विरोधक समजत असले तर ते भ्रमात आहेत. मोदींचे अपयश जनतेच्या लक्षात आले आहे. पण हाच माणूस त्यावर प्रामाणिकपणे उपाय शोधेल असे जनतेला सध्या वाटते. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेखऱ गुप्ता यांना अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत एक वाक्य ऐकविले. राष्ट्रवादाची लाट एकदा उठली की आर्थिक दुरावस्थेकडे जनता खुषीने दुर्लक्ष करते, असे खट्टर म्हणाले. महाराष्ट्र व हरयाणात हाच प्रयोग होत आहे. मोदींच्या प्रामाणिकपणाबद्दल असा विश्वास जनतेला असे का वाटतो याचे आत्मपरिक्षण विरोधी पक्षांनी करण्याची गरज आहे. या आत्मपरिक्षणातून काही उपाय सापडला आणि तो जनतेला पटला तर विरोधी पक्षांच्या काही जागा वाढतील. पण सध्या तरी भाजपाचे पारडे चांगलेच जड आहे.