तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १९ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय मिळविला. भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला, तर काँग्रेसच्या पॅनेलला भोपळासुद्धा फोडता आला नाही. भाजपला व्यापारी गटात एका जागेवर विजय मिळाला. तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अस्तित्व, तर भाजपची अस्मिता पणाला लागलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षच ‘बाहुबली’ ठरला. समितीत २४ वर्षांनंतर प्रथमच दोन तुल्यबळ गट आमने-सामने आले होते. त्यामुळे चुरशीने निवडणूक लढविली गेली होती. समितीच्या सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. हमाल गटातील मतमोजणीने पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. नंतर व्यापारी गटात झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. ग्रामपंचायत गटातील सर्व निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागले. सोसायटी गटातील मतमोजणीने दुपारी एकपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. १९ पैकी राष्ट्रवादीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. उर्वरित १८ पैकी व्यापारी गटातील एका जागेवर भाजपला यश मिळाले, तर अन्य सर्व १७ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला.विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांसह कार्यकर्ते सूतगिरणीच्या कार्यस्थळावर जमले. तेथे आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत सभा झाली. त्यानंतर विजयी उमेदवारांनी अंजनी येथे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)गुलालाशिवाय विजयाचा जल्लोष बाजार समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बाजार समितीपासून सूतगिरणीपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवरून विजयाच्या घोषणा देत रॅली काढली. मात्र, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली नाही. सूतगिरणीवर झालेल्या विजयी सभेसाठीही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत एकजुटीने काम केले. शनिवारी खासदार आणि त्यांच्या गुंडांनी केलेला हल्ला हा लोकशाहीवर केलेला हल्ला होता. मात्र, हुकूमशाही पद्धतीने जनतेत दहशत निर्माण करून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न सूज्ञ मतदारांनी हाणून पाडला आहे.- सुमनताई पाटील, आमदार
तासगावात राष्ट्रवादीच ‘बाहुबली’
By admin | Published: August 03, 2015 12:49 AM