ऑनलाइन लोकमतजळगाव, दि.07 - पक्षात अनेक निष्क्रिय आहेत त्यांची हकालपट्टी करा, सध्याच्या पदाधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही... पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलतात..., अशा अनेक तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आदींनी बैठकीत केल्या. सुळे यांनी सकाळी ९.३० वाजेपासून पक्षाच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयामध्ये बैठकांना सुरुवात केली. त्यात सुरुवातीला शहर कार्यकारिणी, ग्रामीण कार्यकारिणी व शेवटी महिला आघाडीमधील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे, तक्रारी सुळे यांनी ऐकून घेतले. या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. काही लोक डावलतातपक्षाच्या कार्यक्रम किंवा विविध उपक्रमांमध्ये काही लोक जाणीवपूर्वक डावलतात. वरिष्ठांकडे चुकीचे रिपोर्टिंग करतात. हा प्रकार चुकीचा आहे. नेत्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी भुसावळचे उमेश नेमाडे यांनी केली. नव्यांनी आम्हाला शिकवू नये...राष्ट्रवादी काँग्रेस काय आहे..., पवार काय आहेत हे आम्हाला नव्यांनी शिकवू नये. विजया पाटील यांना विचारावे की त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य आहे का, पक्षातील अनेकांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. माजी खासदार वसंतराव मोरे यांना विचारले जात नाही. जे काम करीत नाही त्यांची हकालपट्टी करा. मी दादा, पवार साहेबांना याची माहिती दिली होती. बॅनर तयार होतात, पण ते फक्त व्हॉट्स अॅपवर फिरतात. चमकोगिरी बंद व्हावी, अशा तक्रारी संजय पवार यांनी केल्या. मोठे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारत नाहीमी बसचालक होतो... मला चोपडा भागात काम करताना कोण निवडून येईल याची माहिती होती. चंद्रकांत बारेला यांना उमेदवारीची मागणी नागरिक करीत होते. ही बाब मी वरिष्ठांच्या कानावर घातली. पण मोठे पदाधिकारी सामान्य कार्यकर्त्यांचे ऐकत नाहीत, अशी तक्रार एका कार्यकर्त्याने केली. सर्वांनी शिष्टाचार पाळावा - सुप्रिया सुळेकार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यावर सुप्रिया सुळे यांनी काही सूचना केल्या. त्यात मंत्री असो किंवा कुणीही त्यांनी जिल्ह्यात येताना जिल्हाध्यक्षांना कळवावे. जिल्हाध्यक्ष संबंधित तालुक्यात प्रमुख असतो. या सर्व तक्रारींची माहिती प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घालीन. शिष्टाचार सर्वांनी पाळावा, अशी ताकीदही सुळे यांनी दिली.
जळगावात सुप्रिया सुळे यांच्यासमोर राष्ट्रवादीमधील गटबाजीची गाऱ्हाणी
By admin | Published: October 07, 2016 8:35 PM