ठाणे : काही महिन्यांवर आलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यासाठी राष्ट्रवादीने येत्या ३१ आॅगस्ट रोजी गडकरी रंगायतनमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. पक्षाचे अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. ही मंडळी यानिमित्ताने काय संदेश देणार, अंतर्गत गटबाजीचा कसा समाचार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच याच वेळी राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणीही जाहीर केली जाणार आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी ही माहिती दिली.दुपारी ४ वाजता आयोजित या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, वसंत डावखरे, युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक आदी दिग्गज मंडळी उपस्थित राहतील. कार्यकारिणीत तरुणांसह अनेक ज्येष्ठांना संधी दिली आहे. दरम्यान, सध्या राष्ट्रवादीची धुरा आनंद परांजपे यांच्याकडे दिल्याने अनेक मंडळी नाराज असून, अंतर्गत दुफळी माजली आहे. डावखरे, आव्हाड आणि नाईक अशा तीन गटांत राष्ट्रवादी विखुरली गेली आहे, त्याचा समाचारही नेते घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.
ठाण्यात राष्ट्रवादी फुंकणार निवडणुकीचे रणशिंग
By admin | Published: August 27, 2016 5:02 AM