पुणे: देशात वॉलमार्ट फ्लीपकार्ड सारख्या परदेशी कंपन्यांना केंद शासनाने रिटेल क्षेत्रात शंभर टक्के गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. या परदेशी कंपन्यांची व्यापार विषयक ताकद मोठी असून, देशातील लहान मोठे व्यापारी टिकाव धरु शकणार नाही. यामुळे व्यापारात असमतोल आणणा-या परकीय गुंतवणुकीच्या विरोधात दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने येत्या शुकवारी (दि.२८) रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. याबाबत दि पूना मर्चंटस् चेंबर चे अध्यक्ष पोपटलाल ओत्सवाल यांनी सांगितले की, केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांत अनेक चुकीची धोरण राबवली असून यामुळे व्यापारी रस्त्यांवर आले आहेत. वॉलमार्ट पाठोपाठ ई कॉमर्स मधील अमेझॉनने नुकत्याच आदित्य बिर्ला समुहाचे मोअर, सुपर मार्केट खरेदी करुन किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. या कंपन्या नुकसान सहन करून बाजारावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यासमोर छोटे व मध्यम व्यापारी तग धरु शकणार नाहीत व एकदा स्पर्धा संपल्यावर या परदेशी कंपन्या मनमानी भाववाढ करतील व सर्व व्यापा-यांची सुत्रे त्यांच्या हातात जातील. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. देशात ईस्ट इंडिया कंपनीने जसा व्यापार काबीज केला तसाच आता वॉलमार्ट, अमेझॉन व अन्य परदेशी कंपन्यांच्या हातात सर्व व्यापार जावून त्यांची मक्तेदारी निर्माण होईल. त्यामुळे उत्पादक शेतकरी असो अथवा कारखानदार, ग्राहक यांना मक्तेदार सांगतील त्याप्रमाणे विक्री वा खरेदी करणे भाग पडेल. यामुळेच व्यापारात असमतोलता साधना-या शासनाच्या धोरणांच्या विरोधात व्यापा-यांनी रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या २८ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंदाची घोषणा करण्यात आली आहे.
परदेशी गुंतवणुकीच्या विरोधात व्यापा-यांचा शुक्रवारी देशव्यापी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 4:26 PM
वॉलमार्ट, अमेझॉन व अन्य परदेशी कंपन्यांच्या हातात सर्व व्यापार जावून त्यांची मक्तेदारी निर्माण होईल.यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामुळे व्यापारी रस्त्यांवर : पोपटलाल ओत्सवाल