पुणे : ‘कुणी घर देता का घर’ अशी आर्त विनवणी करीत रसिकांचे हृदय आपल्या अभिनयातून हेलावून टाकणारा रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ मंगळवारी काळाच्या पडद्याआड गेला. ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘हिमालयाची सावली’ ,‘सूर्य पाहिलेला माणूस’ अशा रंगभूमी तसेच चित्रपटातील एकसे बढकर एक दर्जेदार कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्याने नाट्य आणि चित्रपट क्षेत्राला धक्का बसला.
डॉ. लागू यांच्या पश्चात पत्नी दीपा लागू आणि मुलगा आनंद लागू तसेच चुलत भाऊ उदय लागू असा परिवार आहे. मुलगा अमेरिकेमध्ये असतो. श्रीराम बाळकृष्ण लागू यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण मात्र पुण्यात झाले. शाळेसाठी त्यांनी भावे स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काही वर्षे शिक्षण घेतल्यावर डॉक्टर बनण्यासाठी ते बी.जे. मेडिकल महाविद्यालयामध्ये गेले. शिक्षण सुरू असतानाच भालबा केळकर यांच्या 'प्रोग्रेसिव्ह मॅटिक असोसिएशन'मधून त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी प्र.के. अत्रे यांच्या 'उद्याचा संसार' या नाटकात भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. सतत बारा-तेरा वर्षे ते भालबांच्या हाताखाली ‘बेबंदशाही', 'रथ जगन्नाथाचा', 'वेड्याचं घर उन्हात' अशा अनेक नाटकात भूमिका करीत राहिले. १९६४ साली विजय तेंडुलकर यांच्या 'मी जिंकलो, मी हरलो'या नाटकात त्यांनी भूमिका केली. विजया मेहता यांनी 'रंगायन' या संस्थेने ते नाटक सादर केले होते. त्या संस्थेत दोन वर्षे काम केल्यावर थिएटर युनिटमध्ये त्यांनी 'आधे अधुरे' व 'ययाती' ही नाटके केली.
'गिधाडे' या नाटकाच्या वेळी त्यांची दीपा बसरूर या अभिनेत्रीशी जवळीक निर्माण झाली व २४ जुलै १९७१ रोजी दीपा बसरूर दीपा लागू झाल्या. या दोघांनी 'रूपवेध' या संस्थेची स्थापना केली व १९७४ ते १९८९ या काळात चार नाटके सादर केली. त्यानंतर त्यांनी १९७४ व १९९५ साली 'प्रतिमा' व 'क्षितिजापर्यंत समुद्र' ही दोन नाटके रंगमंचावर आणली. पण हा सारा नाट्यसंसार प्रायोगिक रंगभूमीवरील वाटचालीचा होता. प्रायोगिक रंगभूमीबरोबरच त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरही अनेक भूमिका केल्या. 'इथे ओशाळला मृत्यू'पासून त्याची सुरुवात झाली. त्यांनी १९६९ साली ते नाटक सादर केले. त्यानंतर 'वेड्याचं घर उन्हात'. 'गिधाडे'. 'काचेचा चंद्र', 'नटसम्राट'. 'हिमालयाची सावली' अशी अनेक नाटकांतून भूमिका करून डॉ. लागूंनी मराठी रंगभूमीवर स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले.
मराठी चित्रपट आणि रंगभूमी गाजविल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतही डॉ. श्रीराम लागू यांनी आपली छाप उमटविली. व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरच्या भूमिकेद्वारे त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. १९७२ मधील या चित्रपटात त्यांनी वठवलेली शिक्षक ते तमाशाचा फडावरचा एक उपरा पुरुष ही प्रवाही भूमिका लक्षणीय आहे, याचा प्रत्यय आजच्या चित्रपट रसिकांनाही येतो. 'पिंजरा'पाठोपाठ 'सामना', 'सिंहासन', 'सुगंधी कट्टा, 'मुक्ता', 'देवकीनंदन गोपाळा', 'झाकोळ', 'कस्तुरी, 'सोबती', 'पांढरं', 'मसाला' वगैरे चित्रपटांत त्यांनी साकार केलेल्या भूमिका त्यांच्या अभिनयामुळे लक्षात राहिल्या आहेत. 'घरोंदा', 'किनारा', 'इमान धरम', 'एक दिन अचानक' वगैरे हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका म्मरणीय होत्या. डॉ. लागू यांनी 'गिधाडे', 'नटसम्राट', 'किरवंत' वगैरे काही नाटके दिग्दर्शित केली, तर झाकोळ' (१९८०) या एकमेव मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. १९५१ पासून सुरू झालेल्या नाट्य व चित्रपट कारकिर्दीमध्ये जवळजवळ पन्नास वर्षात डॉ. लागू यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारत सरकारतर्फे १९७४ साली 'पद्मश्री', महाराष्ट्र शासनातर्फे 'जीवनगौरव' पुरस्कार, २००० साली 'पुण्यभूषण', त्यामध्ये 'संगीत नाटक अकादमी' आदी पुरस्कारांचा समावेश आहे. मराठी चित्रपटांसाठी त्यांना 'सुगंधी कट्टा'. 'सायना' व 'भिंगरी' या चित्रपटांतील अभिनयासाठी 'फिल्मफेअर' पारितोषिकांनी गौरवले होते. 'घरोंदा' या हिंदी चित्रपटासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
चित्रपटसृष्टीतून स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारून डॉ. लागू मुंबईहून पुण्याला आले व तेथे निवृत्तीचे जीवन जगत होते. परंतु, पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. डॉ लागू यांना दीनानाथ रुग्णालयात काल रात्री 8. 30च्या दरम्यान भरती करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती दीनानाथ हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ धनंजय केळकर यांनी दिली.
अमेरिकेहून त्यांचा मुलगा येणार असल्याने डॉ श्रीराम लागू यांचे पार्थिव गुरुवार दि. 19 रोजी अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात ठेवण्यात येणार आहे.