पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून भाषा विषयाच्या प्रचलित मूल्यमापन पद्धतीतील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलून ते कृतिपत्रिका असे करण्यात आले आहे. त्यामुळे व्याकरण, भाषाभ्यास, वाचन या घटकांचा अभ्यास कृतीच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे. परिणामी मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या भाषा विषयाच्या ८० गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेला अधिक वाव मिळणार आहे. राज्य मंडळातर्फे मराठीसह सर्व भाषा विषयाच्या प्रचलित मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. पारंपरिक दृष्टीकोन बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी भाषेचा संबंध प्रत्यक्षात आपल्या जीवनाशी जोडला पाहिजे. सध्या प्रश्नोत्तर पद्धती हे महत्त्वाचे अंग असल्यामुळे पाठांतर करुन उत्तरे लिहिण्याची सवय विद्यार्थ्यांना झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती क्षमतेत वाढ होत नाही. तसेच भाषेचा व्यवहारात वापर करताना अडचण येते. त्यामुळेच प्रश्नपत्रिकेचे स्वरुप कृतिपत्रिका असे करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २० गुणांच्या तोंडी परीक्षेतही कोणताही बदल करण्यात आला नाही. (प्रतिनिधी)शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गविद्यार्थ्यांच्या ज्ञान,आकलन, उपयोजन क्षमतांचा विकास व्हावा, यासाठी मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. प्रातिनिधीक स्वरुपात दिशादर्शक मार्गदर्शक कृतींचा संच म्हणून कृतिपुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. या पुस्तिकांनुसार शिक्षकांनी चिंतन व अभ्यासाने विविध कृती तयार करणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.घटकनिहाय गुण विभागणीगद्य विभागावर २० गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर पद्य विभागावरील १६ गुणांचे, स्थूलवाचनावर ४ गुणांचे, व्याकरणावर १० गुणांचे आणि उपयोजित लेखनावर ३० गुणांचे प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांना भाषेची समज यावी. भाषेचा व्यवहारात वापर कसा करावा याची माहिती व्हावी, या दृष्टीने आता कृतिपत्रिका दिल्या जाणार आहेत. - कृष्णकुमार पाटील, सचिव, राज्य शिक्षण मंडळ
भाषा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलले
By admin | Published: July 19, 2016 4:52 AM