पुणे : ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा संभाजी उद्यानात बसविण्याची तयारी अभिनेता शरद पोंक्षे आणि पुष्कर श्रोत्री यांच्या नेतृत्वाखालील कलाकारांनी केली आहे.उद्यानाच्या परिसरात जमावबंदीचे आदेश असल्याने पालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय हा पुतळा बसविल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तरीही उद्या ( मंगळवारी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून सर्व कलाकार बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी १० वाजता आंदोलन करणार असून पुतळा आयुक्तांकडे सोपविण्यात येणार आहे. पोंक्षे म्हणाले, गडकरी यांना आम्ही रंगभूमीचे दैवत मानतो. पालिकेवर कोणताही आर्थिक बोजा न टाकता गडकरींचा पुतळा आम्ही स्वखर्चाने तयार केला आहे, तो उद्यानात बसविण्याची आमची इच्छा आहे. याला विरोध करण्याचे काही कारण नाही. उद्या आयुक्तांनी आम्हाला परवानगी दिली नाही तरी आम्ही कोणतीही आडमूठी भूमिका न घेता अत्यंत शांतपणे हा पुतळा आयुक्तांच्या स्वाधीन करू. त्यांनी तो बसविण्यास आमची काही हरकत नसेल. (प्रतिनिधी)- पोंक्षे आणि श्रोत्री यांना संभाजी उद्यानात पाय ठेवून दाखवावा. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. कलाकारांकडून करण्यात येणारे आंदोलन उधळून लावणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले.
गडकरींच्या पुतळ्यासाठी नाट्य परिषद सरसावली
By admin | Published: January 31, 2017 1:01 AM