मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाला विकास आराखड्यातील चुका सुधारण्यासाठी पुढील चार महिन्यांचा अवधी दिला असला तरीदेखील याकामी थेट नवा सनदी अधिकारीच नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.काँग्रेसचे आमदार चरणसिंग सप्रा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशा आशयाचे पत्र पाठविले असून, त्यात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रथमत: विकास आराखड्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने त्यांनी सरकारचे कौतुक केले आहे. परंतु आता विकास आराखड्यातील चुका सुधारताना त्यासाठी सनदी अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी केली आहे. विकास आराखड्यावर तब्बल २५ हजार हरकती / सूचना दाखल व्हाव्यात म्हणजे त्यात किती चुका असतील, याचा अंदाज न बांधलेला बरा; असे त्यांनी म्हटले आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्या मुंबईकरांसाठीच्या विकास आराखड्यात अशा चुका होत असतील तर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहते. शिवाय महापालिकेचे आयुक्त आपली जबाबदारी पार पाडण्यात याबाबत कमी पडले आहेत हेही दिसून येते. ज्या डीपीवर ५.५ कोटी खर्च झाला त्या खर्चाचे काय, एवढ्या सूचना मागविल्या त्याचे काय, महापालिकेच्या निष्काळजीपणाला कारणीभूत कोण? असे अनेक सवाल चरणसिंग सप्रा यांनी विचारले आहेत.
‘डीपीसाठी नवा सनदी अधिकारी नेमा’
By admin | Published: April 24, 2015 1:06 AM