नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४८.३५ टक्के मतदारराजांनी मतदानाचा हक्क बजावून १११ प्रभागातील ५६८ उमेदवारांचा निकाल बुधवारी ईव्हीएममध्ये बंद केला असून, महापालिकेवर आता झेंडा कुणाचा फडकणार याचा फैसला गुरुवारी लागणार आहे. सकाळी १० वाजेपासून चार केंद्रांवर मतमोजणी सुरू होणार आहे. शिवसेना-भाजपाने या वेळी सत्ताधारी राष्ट्रवादीस सत्तेतून बाहेर फेकून पक्षाचे नेते गणेश नाईक यांची सद्दी संपविण्याचा संकल्प केला होता. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर नाईक कुटुंबासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.गोठीवली, तुर्भे, शिरवणे, बोनकोडे, कुकशेत आणि नेरूळ या गावठाणांत प्रतिस्पर्धी उमेदवारांत किरकोळ तणातणी झाली. संध्याकाळी कोपरखैरणे येथे गणेश नाईक यांचे बंधू ज्ञानेश्वर नाईक यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते व भाजपा नेते वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची व मारामारी झाली.
नवी मुंबई महापालिकेवर झेंडा कुणाचा?
By admin | Published: April 23, 2015 6:13 AM