मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपेल्या असून, इच्छुकांनी आप-आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नवापूर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांचा मुलगा शिरीष नाईक हे यावेळी काँग्रेसकडून रिंगणात उतरणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असून, त्यांना युतीची उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवापुराच राजकरणाचे सूत्रं नव्या पिढीच्या हाती येणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.
नवापुरा हा मतदारसंघ काँग्रेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्यावेळी मोदी लाटेतही या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांनी २१ हजार ९७९ मताधिक्य मिळवले होते. मात्र आता त्याच काँग्रेसमध्ये आता दुफळी निर्माण झाली आहे. १९८१ ते २०१४ पर्यंत ३३ वर्ष काँग्रेसचे खासदार राहिलेले माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत यांना लोकसभेला काँग्रेसनं तिकिट नाकारलं. त्यामुळं ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी सुद्धा केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाईक आणि गावीत कुटुंबातील नव्या पिढीच्या हातात नवापुराच्या राजकरणाचे सूत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.
नवापुरा मतदारसंघात नाईक आणि गावीत कुटुंबाचे वर्चस्व आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या ताकदीने आजपर्यंत काँग्रेसनं आपला गड कायम ठेवला आहे. मात्र आता गावीत भाजपमध्ये जाणार असल्याने त्यांचे मोठे आव्हान काँग्रेससमोर असणार आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे शरद गावीत हे सुद्धा इच्छुक असून, उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे मतदारसंघातील बदलणारे राजकरण यावेळी कुणाला विधानसभेत पाठवणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
स्वातंत्र्यानंतर २००९ चा अपवाद वगळता या मतदारसंघात सर्व आमदार काँग्रेस पक्षाचे राहिलेत. केंद्रात कुणाची ही सत्ता आली तरीही येथील मतदारांनी आजपर्यंत काँग्रेसलाच पसंती दिली आहे . मात्र मागील पाच वर्षात पुलाखालून बरच पाणी गेले आहेत. तसेच भरत गावीत यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर, काँग्रेससाठी यावेळी लढत खडतर असणार आहे. त्यातच राजकरणाचे सूत्रं दोन्ही दिग्गज नेत्यांच्या नव्या पिढीच्या हाती येणार असल्याने यावेळी लढत चुरशीची ठरणार आहे.